Join us  

मधुर भांडारकरच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस

By admin | Published: July 06, 2017 9:40 AM

सिनेमाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला एक लाख रूपयांचं बक्षीस दिलं जाइल, अशी घोषणा काँग्रेस नेत्याने केली आहे.

ऑनलाइन लोकमत

अलाहाबाद, दि. 6- दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या "इंदू सरकार" या आगामी सिनेमाला राजकीय नेत्यांचा विरोध वाढतो आहे. काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी हा सिनेमा आधी आपल्याला दाखविला जावा, अशी मागणी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्याकडे केली असताना आता आणखी एका काँग्रेसच्या नेत्याने या सिनेमाला विरोध केला आहे. तसंच सिनेमाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला एक लाख रूपयांचं बक्षीस दिलं जाइल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. अलाहाबादचे काँग्रेस नेते हसीब अहमद यांनी ही घोषणा केली असून त्यासंदर्भातील एक पोस्टर जारी केलं आहे. "नेहरू-गांधी परिवाराची बदनामी करणारा सिनेमा "इंदू सरकार" चा निर्माता-दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या तोंडाला काळं फासणाऱ्या योद्ध्याला १ लाख रुपये रोख इनाम." असं या पोस्टरवर लिहीण्यात आलं आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
 
 
 
 
सिनेमाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी टि्वट करून या पोस्टरला उत्तर दिलं आहे. "व्हा.. इतकं बोलण्याचं स्वातंत्र्य!" असं ट्विट मधुर भांडारकर यांनी केलं आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मधुर भांडारकर यांचं समर्थन केलं आहे. तर दुसरीकडे हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर मला धमक्या येत असल्याचं हसीब अहमद म्हणाले आहेत.
 
 
 
 
याआधी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पत्र लिहिलं आहे. पत्रातून त्यांनी सिनेमा रिलीज होण्याआधी आम्हाला दाखवण्यात यावा अशी मागणी केली आहे. संजय निरुपम यांनी पत्रात लिहिलं आहे की, "भरत शाह निर्मित आणि मधुर भांडारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या इंदू सरकार सिनेमाबद्दल बोलायचं आहे. ट्रेलरनुसार सिनेमा आणीबाणीवर आधारित असल्याचं दिसत आहे. तसंच चित्रपटात आमचे लाडके नेते इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्यासह काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या भूमिका आणि उल्लेख असल्याचं पाहायला मिळालं".
सिनेमातून आमच्या नेत्यांची प्रतिमा मलीन तसंच बदनामी केली नसल्याची खात्री आम्हाला करायची असून सेन्सॉरकडून हिरवा कंदील मिळण्याआधी आम्हाला सिनेमा पाहायचा आहे. तुम्ही आमची समस्या समजून घेऊ शकता आणि मदत कराल अशी अपेक्षा आहे". अशी मागणीही संजय निरुपम यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. 
दरम्यान सिनेमावर आक्षेप घेणारे संजय निरुपम एकटेच व्यक्ती नसून याआधी प्रिया सिंग पॉल यांनी सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. "या सिनेमात इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे या सिनेमावर बंदी आणावी", अशी मागणी प्रिया सिंग पॉल यांनी केली आहे. यानंतर ‘इंदू सरकार’ सिनेमाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती.  प्रिया सिंग पॉल यांनी विरोध केल्याने एक वेगळाच मुद्दा आता चर्चेला आला आहे. कारण प्रिया सिंग पॉल कोण आहेत याची माहिती घेत असताना त्यांनी आपण संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा केला होता.