Join us

तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:48 IST

swiss bank account : स्विस बँका गुन्हेगारांकडून किंवा बेकायदेशीर स्रोतांकडून पैसे स्वीकारत नाहीत. ते प्रत्येक ग्राहकाची कसून तपासणी केल्यानंतर खाते उघडण्याची परवानगी देतात.

swiss bank account : पूर्वी स्विस बँक म्हटलं की काळा पैसा असं डोळ्यांसमोर चित्र उभं राहायचं. कारण, अनेक भारतीय लोकांनी कर चुकवून स्विस बँकांमध्ये आपला पैसा ठेवल्याचे उघड झाले होते. स्विस बँका त्यांच्या मजबूत आणि गुप्त बँकिंगसाठी ओळखल्या जातात. पण आता नियम बदलले आहेत. मोतीलाल ओसवाल यांच्या माहितीनुसार, काही मोठ्या घोटाळ्यांमुळे स्वित्झर्लंडने त्यांचे गुप्तता कायदे थोडे शिथील केले आहेत. आता स्विस बँका इतर देशांना सहकार्य करतात आणि गरज पडल्यास कायदेशीर माहिती देतात. त्यामुळे आता स्विस बँकेत बेकायदेशीर पैसे लपवणं खूप अवघड झालं आहे. पण, तुम्ही या बँकांमध्ये ऑनलाईन खाते उघडू शकता. चला याची प्रक्रिया जाणून घेऊ.

स्विस बँकेत कोण उघडू शकतं खातं?मोतीलाल ओसवाल सांगतात, जवळपास कोणीही स्विस बँकेत खातं उघडू शकतं. पण बँक खातं उघडण्याआधी लोकांची कसून तपासणी करते. कोणतीही सामान्य व्यक्ती आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी खातं उघडू शकतात. यासोबत मोठे उद्योग आणि कंपन्या देखील स्विस बँकेत खातं उघडू शकतात. ज्यांना आपले पैसे गुंतवायचे आहेत, असे लोकही खातं उघडू शकतात. जे स्वित्झर्लंडमध्ये राहत नाहीत, पण त्यांना स्विस बँकेत खातं हवं आहे, ते लोकही खातं उघडू शकतात. पण लक्षात ठेवा, स्विस बँका गुन्हेगारांकडून किंवा चुकीच्या मार्गाने कमावलेले पैसे स्वीकारत नाहीत. त्या प्रत्येक ग्राहकाची व्यवस्थित चौकशी करतात.

स्विस बँकेत खातं कसं उघडायचं?

  • योग्य बँक निवडा: तुमच्या गरजेनुसार चांगली स्विस बँक शोधा.
  • खात्याचा प्रकार ठरवा: तुम्हाला वैयक्तिक, व्यवसायासाठी की गुंतवणुकीसाठी खातं हवं आहे, ते ठरवा.
  • बँकेशी संपर्क साधा: बँकेच्या वेबसाइटवर जा, फोन करा किंवा त्यांच्या शाखेत जाऊन माहिती घ्या.
  • कागदपत्रं जमा करा: बँक तुम्हाला पासपोर्ट, पत्त्याचा पुरावा, तुमच्या पैशांचा स्रोत आणि कर भरल्याची कागदपत्रं मागवेल.
  • तपासणी: बँक तुमची कागदपत्रं तपासते आणि अधिक माहिती विचारू शकते.
  • पैसे जमा करा: बहुतेक बँकांमध्ये कमीतकमी काही रक्कम जमा करावी लागते, जी ५०० ते १० लाख डॉलरपर्यंत असू शकते.
  • खातं सुरू: एकदा तुमचं खातं मंजूर झालं की, तुम्ही ते वापरू शकता.

वाचा - 'या' कंपनीचा शेअर २३९० वरून ५९ रुपयांवर घसरला; सेबीने केलेली कारवाई, आता नवी माहिती समोर

भारतातून ऑनलाइन खातं कसं उघडायचं?भारतात बसून स्विस बँकेत ऑनलाइन खातं उघडणं शक्य आहे, पण सगळी प्रक्रिया ऑनलाइन नसते. काही बँका दूर बसलेल्या लोकांना खातं उघडण्याची परवानगी देतात. तरीही तुम्हाला तुमची कागदपत्रं पाठवावी लागतील किंवा बँकेच्या माणसाला भेटावं लागेल. तुम्हाला तुमच्या पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांच्या नोटरी केलेल्या कॉपी द्याव्या लागतील. काही बँका व्हिडिओ कॉल करून तुमची ओळख तपासतात. बहुतेक वेळा तुम्हाला एकदा तरी बँकेत किंवा त्यांच्या प्रतिनिधीला भेटावं लागतं. ऑनलाइन खातं उघडण्यासाठी कमीतकमी जमा करायची रक्कम जास्त असू शकते.

टॅग्स :स्विस बँकस्वित्झर्लंडबँकिंग क्षेत्रबँक