Join us  

Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 12:08 PM

Vodafone Idea Share Price: टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये २४ मे रोजी ७.५ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीनं यापूर्वी आपला सर्वात मोठा एफपीओदेखील आणला होता. पाहा काय आहे या वाढीमागील कारण...

Vodafone Idea Share Price: टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये २४ मे रोजी ७.५ टक्क्यांची वाढ झाली. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ब्रोकरेज फर्म यूबीएसनं अपग्रेड केलेलं रेटिंग. यूबीएसनं व्होडाफोन आयडियाच्या (Vodafone Idea) शेअरचं रेटिंग 'न्यूट्रल' वरून 'बाय' केलं आहे. जवळपास वर्षभरातील शेअरचं हे पहिलेच 'बाय' रेटिंग आहे. या वर्षी मार्चमध्ये यूबीएसनं व्होडाफोन आयडियाच्या शेअरचे रेटिंग 'न्यूट्रल' केलं होतं. 

व्होडाफोन आयडियाचा शेअर बीएसईवर २४ मे रोजी सकाळी तेजीसह १४.२३ रुपयांवर उघडला. दिवसभरात तो ११.६ टक्क्यांनी वधारून १५.६८ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. अपर प्राइस बँड हिट झाल्यानंतर इंट्राडेमध्ये शेअरची अपर प्राइस बँड लिमिट १० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत (१६.१५ रुपये) वाढवण्यात आली. व्यवहाराच्या अखेरिस हा शेअर ७.५ टक्क्यांनी वधारून १५.११ रुपयांवर बंद झाला. कंपनीचं मार्केट कॅप १ लाख कोटी रुपयांच्या पुढे आहे. 

शेअर १८ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता 

येत्या १२ महिन्यांत व्होडाफोन आयडियाचे शेअर्स १८ रुपयांच्या पातळीवर पोहोचतील, अशी अपेक्षा यूबीएसनं व्यक्त केलीये. ही किंमत २३ मे रोजी बीएसईवर १४.०५ रुपयांच्या बंद किमतीपेक्षा २८ टक्क्यांनी अधिक आहे. थकबाकीबाबत सरकारकडून दिलासा मिळाल्यास शेअरमध्ये सुमारे ७० ते ८० टक्के वाढ होण्याची शक्यता यूएसबीनं व्यक्त केली आहे. 

१५ ते २० टक्के टॅरिफ वाढणार? 

पुढील १२ ते २४ महिन्यांत १५ ते २० टक्क्यांपर्यंत टॅरिफ वाढ होईल, असा अंदाज ब्रोकरेज कंपनीनं व्यक्त केला आहे. यूबीएसनं यापूर्वी आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत दरांमध्ये १०% वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. व्होडाफोन आयडियानं नुकतेच फॉलो ऑन पब्लिक ऑफरच्या (एफपीओ) माध्यमातून १८,००० कोटी रुपये उभे केले. हा देशातील आजवरचा सर्वात मोठा एफपीओ होता. यूबीएसच्या म्हणण्यानुसार, व्होडाफोन आयडियाला सुप्रीम कोर्टाकडून एजीआरमध्ये कपात किंवा थकबाकीचे इक्विटीमध्ये रूपांतर किंवा सरकारकडून काही प्रकारच्या मोरेटोरियमच्या स्वरूपात काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)शेअर बाजार