Join us

Trump Tariff चा 'या' क्षेत्रांवर परिणाम नाही; शेअर्समध्ये तेजी, IT शेअर्स आपटले

By जयदीप दाभोळकर | Updated: April 3, 2025 11:15 IST

Trump Tariff Stock Market Effect: ट्रम्प यांच्या या शुल्काचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर जपान आणि कोरियाच्या बाजाराइतका दिसून आलेला नाही. सेन्सेक्स-निफ्टी जोरदार घसरणीसह उघडल्यानंतर रिकव्हरी मोडमध्ये आहे.

Trump Tariff Stock Market Effect: ट्रम्प यांच्या या शुल्काचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर जपान आणि कोरियाच्या बाजाराइतका दिसून आलेला नाही. सेन्सेक्स-निफ्टी जोरदार घसरणीसह उघडल्यानंतर रिकव्हरी मोडमध्ये आहे. ऑटो-आयटी शेअर्सवर काही प्रमाणात दबाव असला तरी फार्मा कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत.

ट्रम्प यांनी १८० हून अधिक देशांवर भरमसाठ कर लादल्यानंतर गुरुवारी आशियाई बाजारात घसरण झाली. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ३.०२ टक्क्यांनी घसरला, तर टोपिक्स निर्देशांक ३.१९ टक्क्यांनी घसरला. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक १.५७ टक्के, तर कोस्डॅत निर्देशांक ०.५५ टक्क्यांनी घसरला.

किती लादलं शुल्क?

अमेरिकन शेअर बाजार बंद झाल्यानंतर ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के परस्पर शुल्क लादलं, हे भारतानं अमेरिकन आयातीवर लादलेल्या शुल्काच्या निम्मं आहे. याचा परिणाम सुरुवातीला देशांतर्गत शेअर बाजारावर झाला, पण काही मिनिटांनंतर सेन्सेक्स-निफ्टी रिकव्हरी मोडमध्ये आला. दरम्यान, फार्मा शेअर्समध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे.

फार्मा निर्देशांक ४.५५ टक्क्यांनी वधारला

सकाळी पावणेदहाच्या सुमारास निफ्टी फार्मा निर्देशांक ४.५५ टक्क्यांनी वधारला. यातील सर्व २० शेअर्स ग्रीन झोनमध्ये होते. ग्लँड ७.७२ टक्के, ऑरो फार्मा ६.८९ टक्के आणि ल्युपिन ६.२२ टक्क्यांनी वधारले. डॉ. रेड्डीज ५.६७ टक्के, तर सन फार्मा ५.१३ टक्क्यांनी वधारला. जायडस कॅडिला ४.७९, डिव्हिस लॅब ४.५७, सिप्ला ४.५६, नॅटको ३.९४, बायोकॉनमध्ये ३.६४ टक्क्यांची वाढ झाली.

आयटी क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान

सकाळी १० वाजता निफ्टी ऑटो १.२६ टक्क्यांनी घसरला. निफ्टी आयटीमध्ये सर्वाधिक ३.२१ टक्क्यांची घसरण झाली. आयटी आणि टेलिकॉम निर्देशांकही ३ टक्क्यांहून अधिक घसरला. हेल्थ केअरमध्ये २.२७ टक्क्यांची वाढ झाली. तर पीएसयू बँका ग्रीन आणि खासगी बँका रेड झोनमध्ये व्यवहार करत होत्या.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पशेअर बाजारगुंतवणूक