Join us  

रेल्वेच्या कंपनीनं दिली मोठी ऑर्डर, 'या' पॉवर शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 10:43 AM

पॉवर क्षेत्रातील कंपनीला रेल्वेकडून मोठी ऑर्डर मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

Torrent power share price: पॉवर क्षेत्रातील कंपनी टोरेंट पॉवरनं रेल्वेकडून मोठी ऑर्डर मिळाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे एनर्जी मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडकडून (REMCL) ग्रीडची चोवीस तास उपलब्धता असलेल्या रिन्यूएबल एनर्जी प्रकल्पासाठी एलओए मिळाल्याची माहिती त्यांनी शुक्रवारी दिली. टॉरेंट पॉवरनं सांगितलं की, वीज खरेदी करारावर (पीपीए) स्वाक्षरी केल्यापासून २४ महिन्यांच्या आत प्रकल्प सुरू केला जाईल. 

काय आहेत डिटेल्स? 

अंदाजे ३२५ मेगावॅट रिन्युएबल कॅपॅसिटी स्थापित करण्यासाठी प्रकल्पाची किंमत अंदाजे २,७०० कोटी रुपये आहे. या अंतर्गत १०० मेगावॅट क्षमता २४ तास रिन्युएबल एनर्जीच्या पुरवठ्यासाठी आहे. कंपनीनं सांगितलं की ३२५ मेगावॅट रिन्युएबल कॅपॅसिटी पवन, सौर आणि बॅटरी स्टोरेजचा समावेश आहे. हा प्रकल्प २५ वर्षांच्या कालावधीसाठी ४.२५ रुपये प्रति किलोवॅट (युनिट) दरानं मिळवण्यात आला आहे. 

शेअरमध्ये तुफान तेजी 

आठवड्याच्या व्यवहाराच्या अखेरच्या दिवशी गुंतवणूकदार टोरेंट पॉवरच्या शेअर्सवर तुटून पडल्याचं दिसून आलं. शुक्रवारी कंपनीचा शेअर ३.४३ टक्क्यांनी वाढून १११६.६५ रुपयांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान शेअरची किंमत ११३८.९५ रुपयांपर्यंत गेली. एका वर्षात हा स्टॉक १२० टक्क्यांहून अधिक वाढला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये शेअरनं १,२३५.१० रुपयांच्या ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला होता.  

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजार