Join us
Daily Top 2Weekly Top 5

₹५७५ वर जाऊ शकतो टाटांचा 'हा' शेअर, ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर; अयोध्येशीही कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 15:09 IST

कंपनीच्या शेअरनं गुरुवारी आजवरचा उच्चांकी स्तर गाठला आहे.

Indian Hotels Share:  तुम्ही टाटा ग्रुपच्या कोणत्याही शेअरवर नशीब आजमावण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही इंडियन हॉटेल्सच्या शेअरवर लक्ष देऊ शकता. टाटा समूहाचा हा शेअर गुरुवारी बीएसईवर 1 टक्क्यांपेक्षा जास्त वाढून 530.40 रुपयांवर पोहोचला. हा या कंपनीचा 52 आठवड्यांचा नवा उच्चांकी स्तर आहे. याआधी बुधवारी या शेअरमध्ये 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आली आणि हा शेअर 524.80 रुपयांवर बंद झाला. येथे, ब्रोकरेज टाटा समूहाच्या या शेअरवर बुलिश दिसून येत आहेत, तसंच त्यांनी यात गुंतवणूकीचा सल्ला दिलाय. 

काय आहे टार्गेट प्राईज? 

HSBC ने इंडियन हॉटेल्सच्या शेअर्सवर 575 रुपये टार्गेट प्राईज दिली आहे आणि त्यावर बाय रेटिंग दिलं आहे. तर दुसरीकडे प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत त्यांची बॅलन्स शीट अतिशय मजबूत आहे. जेएम फायनान्शियलने इंडियन हॉटेल्सच्या शेअर्सवर 555 रुपये टार्गेट प्राईज ठेवली आहे. ब्रोकरेज फर्मनं सांगितले की, “आयएचसीएलचे पॅन इंडिया कव्हरेज, सर्व ग्राहक विभागांमध्ये विस्तृत उपस्थिती, उत्कृष्ट ब्रँड्स आणि भांडवली वाटपावर फोकस यामुळे सकारात्मक परिणाम होत आहेत,” असं ब्रोकरेज फर्मनं म्हटलंय. 

कंपनीबाबत माहिती 

या आर्थिक वर्षात कंपनीनं 28 हॉटेल्सशी करार केला आहे आणि 16 हॉटेल्स उघडली आहेत. यासह पोर्टफोलिओ 285 हॉटेल्सपर्यंत पोहोचला आहे. यात 130 पेक्षा अधिक ठिकाणांवरील 85 हॉटेल्सची पाइपलाइन देखील समाविष्ट आहे. 285 हॉटेल्सपैकी 105 हॉटेल्स ताज ब्रँड अंतर्गत, 92 हॉटेल्स विवांता आणि सिलेक्शन हॉटेल्स अंतर्गत आणि उर्वरित 88 हॉटेल्स जिंजर हॉटेल्स ब्रँड अंतर्गत कार्यरत आहेत.  

अयोध्येतही हॉटेल सुरू होणार 

टाटा समूहाची कंपनी इंडियन हॉटेल्सनं नुकतेच उत्तर प्रदेशातील अयोध्येत तिसरं हॉटेल सुरू करण्याच्या कराराची घोषणा केली आहे. 1.3 एकरमध्ये पसरलेल्या, 150 खोल्यांचे हॉटेल इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) सिलेक्शन हॉटेल्स म्हणून ओळखलं जाईल, असे हॉटेल समूहानं एका निवेदनात म्हटलं आहे. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. यातील ब्रोकरेजची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. )

टॅग्स :टाटाअयोध्या