Join us

Tata च्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना दिला ₹२.५६ लाख कोटींचा जोरदार झटका; पुढे काय असेल स्थिती?

By जयदीप दाभोळकर | Updated: March 22, 2025 10:31 IST

Tata Stock Price: देशातील सर्वात मोठं औद्योगिक घराणं असलेल्या टाटा समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सनं यंदा चांगली कामगिरी केलेली नाही. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये या शेअर्सचं एकूण मार्केट कॅप २.५६ लाख कोटी रुपयांनी घसरलंय.

Tata Stock Price: देशातील सर्वात मोठं औद्योगिक घराणं असलेल्या टाटा समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सनं यंदा चांगली कामगिरी केलेली नाही. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये या शेअर्सचं एकूण मार्केट कॅप २.५६ लाख कोटी रुपयांनी घसरून सुमारे २७.४६ लाख कोटी रुपयांवर आलं. गेल्या आर्थिक वर्षात समूहाच्या दोन डझनहून अधिक कंपन्यांचं मार्केट कॅप सुमारे ३० लाख कोटी रुपये होते. या आर्थिक वर्षात समूहाच्या १५ कंपन्यांचं मार्केट कॅप घसरलंय. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसला सर्वात मोठा फटका बसलाय. त्या खालोखाल टाटा मोटर्स आणि टायटन कंपनीचा क्रमांक लागतो. या घसरणीमुळे टीसीएस देशातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर घसरली. रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या तर एचडीएफसी बँक दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टाटा समूहातील आणखी काही कंपन्यांचं मार्केट कॅप घटलं आहे. यामध्ये आर्टसन, ऑटोमोबाइल कॉर्पोरेशन ऑफ गोवा, ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंब्लीज, रॅलिस इंडिया, टाटा केमिकल्स, टाटा कम्युनिकेशन्स, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, टाटा एलेक्सी, टाटा पॉवर कंपनी, टाटा टेक्नॉलॉजीज आणि टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) यांचा समावेश आहे. याचा सर्वाधिक फटका टीसीएसच्या गुंतवणूकदारांना बसलाय. या आर्थिक वर्षात त्यांच्या संपत्तीत १.३९ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत जवळपास १० टक्क्यांची घसरण झाली आहे.

टीसीएसचे शेअर्स का घसरले?

याचे सर्वात मोठे कारण म्हणजे गेल्या वर्षभरापासून आयटी क्षेत्रात कमकुवतपणा दिसून येत आहे. महागाई वाढत आहे आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था कमकुवत होत आहे, अशी भीती लोकांना वाटत आहे. त्यामुळे अमेरिकन कंपन्या आयटीवर कमी खर्च करत आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक वर्ष २०२५ मध्ये टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत ३१ टक्क्यांनी घसरली आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप ७९,०२७ कोटी रुपयांनी कमी झालंय. भारतातील सर्वात मोठ्या ईव्ही कार उत्पादककंपनीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं.

टायटनबद्दल बोलायचं झालं तर ९ महिन्यांत कंपनीच्या महसुलात २२ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी नफ्यात ९.५ टक्के घट झाली आहे. शेअर्सच्या घसरणीमुळे कंपनीचं मार्केट कॅप ६४,755 कोटी रुपयांनी कमी झालंय. टाटा केमिकल्स, ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स, टीआरएफ, रॅलिस इंडिया आणि टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स या टाटा समूहातील अन्य कंपन्यांनाही चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्यांच्या शेअर्सचे भाव घसरले. पण काही शेअर्स असेही आहेत ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे.

पुढील वाटचाल कशी असेल?

टाटा स्टील, नेल्को, बनारस हॉटेल्स, ओरिएंटल हॉटेल्स, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, तेजस नेटवर्क्स, इंडियन हॉटेल्स कंपनी (आयएचसीएल), ट्रेंट आणि व्होल्टास यांच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. टाटा समूहाची एफएमसीजी कंपनी ट्रेंटच्या शेअरच्या किंमतीत ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये ४५,४८३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे इंडियन हॉटेल्स कंपनीचा (IHCL) शेअर ३७ टक्क्यांनी वधारलाय. यामुळे कंपनीचं मार्केट कॅप ३१,३३० कोटी रुपयांनी वाढलंय, तर व्होल्टासच्या मार्केट कॅपमध्ये १२,९३४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटागुंतवणूकशेअर बाजार