Join us  

SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 3:41 PM

Share Market SBI Shares: टाटा आणि अंबानी ग्रुपला मोठा झटका, 'इतक्या' कोटींचा फटका.

Share Market SBI Shares: मागील आठवडा शेअर बाजारासाठी खूप चांगला ठरला. सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 1.30 लाख कोटी रुपयांची वाढ झली. यात देशातील सर्वात मोठ्या SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा झाला. शेअरधारकांनी अवघ्या एका आठवड्याच्या ट्रेडिंगमध्ये 45,000 कोटींहून अधिक कमाई केली, तर दुसरीकडे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांना तोटा सहन करावा लागला.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या टॉप-10 कंपन्यांपैकी ज्या सहा कंपन्यांचे बाजार मूल्य वाढले, त्यात SBI, ICICI बँक, भारती एअरटेल, ITC, LIC आणि Infosys चा समावेश आहे. दुसरीकडे, मुकेश अंबानींच्या रिलायन्स, टाटा समूहाच्या टीसीएससह एचडीएफसी बँक आणि एचयूएलच्या मार्केट कॅपमध्ये घट झाली आहे.

एसबीआयची सर्वोच्च कामगिरीगेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 641.83 अंकांनी किंवा 0.87 टक्क्यांनी वाढला. या दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स तुफानी वेगाने वधारले आणि नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. एसबीआयच्या शेअरने 816.90 रुपयांची उच्च पातळी गाठली. शेअर्सच्या वाढीमुळे बँकेच्या बाजार मूल्यात जोरदार वाढ झाली आणि हे वाढून 7,15,218.40 कोटी रुपये झाले. यानुसार SBI गुंतवणूकदारांनी आठवड्यातील ट्रेडिंग दिवसांमध्ये 45,158.54 कोटी रुपयांची कमाई केली.

या बँकेचे शेअर्सही वधारलेस्टेट बँकेसह, खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेचे बाजार भांडवलदेखील 28,726.33 कोटी रुपयांनी वाढून 7,77,750.22 कोटी रुपये झाले. याशिवाय दूरसंचार क्षेत्रातील भारती एअरटेलचाही कमाई करणाऱ्या कंपन्यांमध्ये समावेश आहे. कंपनीचे बाजार भांडवल 20,747.99 कोटी रुपयांनी वाढून 7,51,406.35 कोटी रुपयांवर पोहोचले. ITC चे मार्केटदेखील कॅप रु. 18,914.35 कोटींनी वाढून रु. 5,49,265.32 कोटी झाले. याशिवाय, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) चे बाजार मूल्य 9,487.5 कोटी रुपयांनी वाढून 6,24,941.40 कोटी रुपयांवर पोहोचले. 

रिलायन्स-टीसीएसला दणकागेल्या आठवड्यात मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला. रिलायन्स मार्केट कॅप 26,115.56 कोटी रुपयांनी घसरून 19,64,079.96 कोटी रुपयांवर आले. यानंतर एचडीएफसी बँकेच्या गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. HDFC बँकेचे मार्केट कॅप रु. 16,371.34 कोटींनी घसरून रु. 11,46,943.59 कोटींवर आले. याशिवाय TCS मार्केट कॅप 5,282.41 कोटी रुपयांनी घसरून 13,79,522.50 कोटी रुपयांवर आणि हिंदुस्तान युनिलिव्हर 2,525.81 कोटी रुपयांनी घसरून 5,21,961.70 कोटी रुपयांवर आले.

(टीप- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक