Join us  

विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 12:13 PM

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाचा निव्वळ नफा गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत ४७.८ टक्क्यांनी वाढलाय.

Maruti Suzuki India Q4 Results : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाचा निव्वळ नफा (Maruti Suzuki India Q4 Results) गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत ४७.८ टक्क्यांनी वाढून ३,८७७.८ कोटी रुपयांवर पोहोचला. प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात झालेली विक्री आणि अनुकूल किमतींमुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे.  

आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २,६२३.६ कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीनं आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजेच २० लाख वाहनांची विक्री केली असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. सलग तिसऱ्या वर्षी ही कंपनी अव्वल निर्यातदारही राहिली. आता भारतातून होणाऱ्या एकूण प्रवासी वाहनांच्या निर्यातीत कंपनीचा वाटा ४१.८ टक्के आहे.  

शेअरधारकांना डिविडंड 

मारुती सुझुकी इंडियाच्या संचालक मंडळानं २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर १२५ रुपये डिविडंड देण्याची शिफारस केली आहे. मारुतीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा डिविडंड आहे. मारुती सुझुकी इंडियाने ८ जुलै २००४ पासून २० वेळा डिविडंड जाहीर केलाय. गेल्या १२ महिन्यांत कंपनीनं ९० रुपये प्रति शेअर इक्विटी डिविडंड जाहीर केला आहे. सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार कंपनीचं डिविडंड यील्ड ०.७१ टक्के आहे. कंपनीने २०२३ मध्ये ९० रुपये आणि २०२२ मध्ये ६० रुपये डिविडंड दिला. 

शेअरची स्थिती काय? 

मारुती सुझुकी इंडियाचा शेअर शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात घसरणीसह बंद झाला. कंपनीचा शेअर १.७० टक्के म्हणजेच २१९.०५ रुपयांच्या घसरणीसह १२,६८७.०५ रुपयांवर बंद झाला. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १३,०६६.८५ रुपये आहे. तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ८,४७० रुपये आहे. मारुती सुझुकी इंडियाचं बाजार भांडवल शुक्रवारी बीएसईवर ३,९८,८८४.१२ कोटी रुपये होतं.

 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :मारुती सुझुकीशेअर बाजार