Reliance Power Share Price: उद्योगपती अनिल अंबानी यांना कधीकाळी रस्त्यावर येण्याची वेळ आली होती. त्यांच्यावर हजारो कोटींचे कर्ज होते, ज्यामुळे त्यांच्या बहुतांश कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या. पण, गेल्या काही काळापासून त्यांची परिस्थिती हळुहळू सुधारत आहे. यामुळेच गुंतवणूकदारांचा त्यांच्यावरील विश्वासही वाढतोय. ताज्या अपडेटनुसार, अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स पॉवरने शेअर्सद्वारे 348.15 कोटी रुपये उभारले आहेत. या पैशातून कंपनी व्यवसायाचा विस्तार करेल.
पैसे कसे उभारले?रिलायन्स पॉवरने प्रेफरेंशियल इश्यूद्वारे ही रक्कम उभारली आहे. कंपनीने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला 9.55 कोटी शेअर्स आणि बसेरा होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडला 1 कोटी शेअर्स दिले. हे 10.55 कोटी शेअर्स 33 रुपये प्रति शेअर या किमतीने जारी करण्यात आले आहेत. यामध्ये प्रति शेअर 23 रुपये प्रीमियमचा समावेश आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपचा एक भाग आहे आणि रिलायन्स पॉवरची नियंत्रक भागधारक आहे.
यापूर्वीही निधी उभारण्यात आला ऑक्टोबर 2024 मध्येही रिलायन्स पॉवरने 46.20 कोटी वॉरंट जारी करुव 1,525 कोटी रुपये उभारले होते. या वॉरंटवरील 25% रक्कम आगाऊ भरण्यात आली आणि उर्वरित 75% रक्कम 48 महिन्यांत भरायची आहे. हे वॉरंट नंतर त्याच संख्येच्या शेअर्समध्ये रूपांतरित केले जाऊ शकतात. रिलायन्स पॉवरने म्हटले की, त्यांच्याकडे कोणतेही बँक कर्ज नाही, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे. यामुळे कंपनीला भविष्यातील संधींचा फायदा घेण्यास आणि दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यास मदत होईल.
स्टॉकमध्ये वाढही बातमी समोर आल्यानंतर 8 मे च्या ट्रेडिंग सत्रात कंपनीच्या स्टॉकमध्ये थोडीशी वाढ दिसून आली. गुरुवारी सकाळी कंपनीचे शेअर्स सुमारे 1 टक्क्याने वाढून उघडले. यासह, कंपनीचे मार्केट कॅप 15,800 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 54.25 रुपये आहे आणि निचांक 23.26 रुपये आहे.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)