Join us  

एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 1:58 PM

Rekha Jhunjhunwala Tata Share : टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअरमध्ये सोमवारी मोठी घसरण झाली. यानंतर रेखा झुनझुनवाला यांना मोठा फटका बसला.

Rekha Jhunjhunwala Tata Share : टाटा समूहाची कंपनी टायटनच्या शेअरमध्ये सोमवारी घसरण झाली. अपेक्षेपेक्षा कमकुवत निकालानंतर सोमवारी मुंबई शेअर बाजारात टायटनचा शेअर ७ टक्क्यांनी घसरून ३,२८७ रुपयांवर आला. शुक्रवारी कंपनीचा शेअर ३५३५.४० रुपयांवर बंद झाला होता. सोमवारी कामकाजादरम्यान टायटनच्या शेअरमध्ये २४८ रुपयांची घसरण झाली. टायटनच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे ज्येष्ठ गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांना मोठा झटका लागला आहे. टायटनच्या शेअर्सच्या घसरणीमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या नेटवर्थमध्ये एकाच दिवसात ११०० कोटी रुपयांची घट झाली. 

एका दिवसात ११७० कोटींचा झटका 

टायटनमध्ये ज्येष्ठ गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांचा मोठा हिस्सा आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे ४७,४८३,४७० शेअर्स आहेत. झुनझुनवाला यांचा कंपनीत ५.३५ टक्के हिस्सा आहे. टायटनच्या शेअरमध्ये सोमवारी २४८ रुपयांची घसरण झाली आहे. त्यानुसार झुनझुनवाला यांच्या संपत्तीत एका दिवसात ११७० कोटींहून अधिक घट झाली आहे. 

४१०० रुपयांचं टार्गेट 

मोठ्या घसरणीनंतरही टायटनच्या शेअर्सवर एक्सपर्ट्स बुलिश दिसून येत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसनं टायटनच्या शेअर्सवर 'बाय' रेटिंग कायम ठेवलं असून ४,१०० रुपयांचे टार्गेट प्राइस ठेवलं आहे. तर ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीजनं टायटनच्या शेअर्सला होल्ड रेटिंग देत कंपनीच्या शेअर्ससाठी ३५०० रुपयांचे टार्गेट दिलं आहे. विदेशी ब्रोकरेज हाऊस यूबीएसनं टायटनच्या शेअर्ससाठी ३९०० रुपयांची टार्गेट प्राइस दिलं असून कंपनीच्या शेअर्सना न्यूट्रल रेटिंग दिलंय. गोल्डमन सॅक्सनं टायटनच्या शेअर्सना बाय रेटिंगसह ३९५० रुपयांचे टार्गेट प्राइस दिलं आहे. 

मार्च २०२४ तिमाहीत टायटनचा एकत्रित निव्वळ नफा ५ टक्क्यांनी वाढून ७७१ कोटी रुपये झाला आहे. तर कंपनीचं एकूण उत्पन्न २२ टक्क्यांनी कमी होऊन ११४७२ कोटी रुपयांवर आलं आहे. वर्षभरात टायटनच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची वाढ झाली आहे. टायटनच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ३८८५ रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २६५६.६० रुपये आहे. 

(टीप : यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजार