Join us  

रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले ५ लाख शेअर्स, घसरत्या बाजारातही स्टॉकनं पकडला तुफान स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 2:55 PM

Rekha Jhunjhunwala: शुक्रवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसून आले. असं असतानाही झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेल्या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे.

शुक्रवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसून आले. साखर कंपनी केएम शुगर मिल्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. केएम शुगर मिल्सचे (KM Sugar Mills) शेअर्स शुक्रवारी 15 टक्क्यांहून अधिक वाढून 41.49 रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी केएम शुगर मिलच्या शेअर्सनं 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. दिग्गज गुंतवणूकदार रेखा राकेश झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांनी साखर कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. झुनझुनवाला यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये केएम शुगर मिल्सचे शेअर्स जोडले आहेत. झुनझुनवाला यांनी मार्च तिमाहीत केएम शुगर मिल्सचे सुमारे 5 लाख शेअर्स किंवा कंपनीतील 0.54% स्टेक खरेदी केले आहेत. 

केएम शुगर मिल्स लिमिटेडच्या (KM Sugar Mills) शेअर्समध्ये 4 वर्षांत 490% वाढ झाली आहे. गेल्या 4 वर्षात कंपनीचे शेअर्स 490% वाढले आहेत. 24 एप्रिल 2020 रोजी कंपनीचे शेअर्स 6.80 रुपयांवर होते. कंपनीचे 19 एप्रिल 2024 रोजी 41.49 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली. केएम शुगर मिल्सचे शेअर्स 19 मार्च 2024 रोजी 29.40 रुपयांवर होते.  

या कंपन्यांतील हिस्सा केला कमी 

ब्लूमबर्गच्या डेटानुसार, डिसेंबर 2023 तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 26 कंपन्यांचे शेअर्स होते आणि त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.9 बिलियन डॉलर्स होते. या 26 कंपन्यांपैकी 13 कंपन्यांनी मार्च 2024 तिमाहीसाठी त्यांच्या शेअरहोल्डिंग डेटाचा खुलासा केलाय. यापैकी क्रिसिल, टाटा कम्युनिकेशन्स, फोर्टिस हेल्थकेअर, राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स, एनसीसी आणि कॅनरा बँक यामधील हिस्सा कमी झालाय. तर 6 कंपन्यांमधील रेखा झुनझुनवाला यांच्या स्टेकमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

टाटाचे 7 लाखांपेक्षा अधिक शेअर विकले 

त्यांनी मार्च 2024 तिमाहीत टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडचे ​​7.34 लाख शेअर्स विकले. कंपनीमध्ये आता त्यांचा हिस्सा कमी होऊन 1.58 टक्के झालाय, जो आधी 1.84 टक्के होता. झुनझुनवाला यांनी मार्च 2024 च्या तिमाहीत CRISIL चे 20000 शेअर्स देखील विकले आहेत. 

आता झुनझुनवाला यांचा CRISIL मधील स्टेक 5.47% वरून 5.44% झालाय. याशिवाय रेखा झुनझुनवाला यांनी फोर्टिस हेल्थकेअरचे 44.28 लाख शेअर्स विकले आहेत. कंपनीत आता त्यांचा हिस्सा 4.66 टक्क्यांवरून 4.07 टक्क्यांवर आलाय. याशिवाय त्यांनी राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्सचे 12000 शेअर्सही विकले आहेत. आता कंपनीतील झुनझुनवाला यांचा हिस्सा 5.06 टक्क्यांवर आला आहे. रेखा झुनझुनवाला यांनी एनसीसीचे 38.07 लाख शेअर्सही विकले आहेत. 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :व्यवसायशेअर बाजार