Join us

आता हा ‘बाबा’ ठरवेल तुम्ही कमावणार की...

By प्रसाद गो.जोशी | Updated: August 14, 2023 08:25 IST

आगामी सप्ताहामध्ये चलनवाढीची आकडेवारी जाहीर होत असून, त्यावर बाजाराची वाटचाल ठरणार आहे. 

प्रसाद गो. जोशी: भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना महागाई वाढण्याच्या व्यक्त केलेल्या शंकेमुळे सलग दुसऱ्या सप्ताहात बाजार घसरला. आगामी सप्ताहामध्ये चलनवाढीची आकडेवारी जाहीर होत असून, त्यावर बाजाराची वाटचाल ठरणार आहे. 

मंगळवारी स्वातंत्र्यदिनाच्या सुटीमुळे सप्ताहात कमी दिवस व्यवहार होणार आहेत. शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये सलग दुसऱ्या सप्ताहात घट झाली आहे. सेन्सेक्स ३९८.६० अंशांनी कमी होत ६५,३२२.६५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १९,४२८.३० अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये ८८.७० अंशांची घट झाली आहे. विशेष म्हणजे मिडकॅप, स्माॅलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ झाली आहे. हे निर्देशांक अनुक्रमे २६६.९० आणि २२० अंशांनी वाढले आहेत.

या सप्ताहामध्ये जुलै महिन्यातील किरकोळ आणि घाऊक बाजारभावावर आधारित चलनवाढीच्या दराची सोमवारी घोषणा होणार आहे. त्यावर बाजाराची एकूण वाटचाल अवलंबून राहील. औद्योगिक उत्पादनाची आकडेवारीही जाहीर होणार आहे. चीनमधील उत्पादनाची आकडेवारी आणि फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या मुद्द्यांकडेही नजर राहील. गतसप्ताहात बँका व एफएमसीजी कंपन्यांची विक्री झाली, तर टेक्नॉलॉजी, औषध निर्मिती, धातू कंपन्यांमध्ये वाढ झाली आहे.

परकीय वित्तसंस्था विक्रीच्या मूडमध्ये

गेले पाच महिने सातत्याने खरेदी करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहात विक्री केली. याआधीच्या सप्ताहाप्रमाणेच या संस्थांनी ४७ हजार कोटी रुपये बाजारातून काढून घेतले. मात्र, देशांतर्गत वित्तसंस्थांनी खरेदी करून बाजाराची घसरण रोखण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थांनी २२२४ कोटी रुपये बाजारात ओतले आहेत.

 

टॅग्स :शेअर बाजारभारतीय रिझर्व्ह बँक