Lenskart IPO: रिटेल आयवेअर विक्रेता लेन्सकार्ट आपल्या आयपीओद्वारे शेअर बाजारात एन्ट्री घेण्यास तयार आहे, ज्यामध्ये त्यांनी जवळपास ₹७०,००० कोटी ($८ अब्ज) मूल्यांकनाचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवलंय. कंपनीनं प्रति शेअर ₹३८२ ते ₹४०२ चा प्राइस बँडही निश्चित केला आहे. या प्राईज बँडमुळे लेन्सकार्ट भारतातील सर्वाधिक मूल्यांकित कंझ्युमर-टेक लिस्टिंगपैकी एक बनू शकते. मात्र, या आकड्यांमुळे लेन्सकार्टचे हे प्रीमियम मूल्यांकन खरोखरच योग्य आहे का, याबद्दल शेअर बजारात मात्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पाहूया खरंच इतकं मूल्यांकन योग्य आहे का?
लेन्सकार्टच्या आयपीओबद्दल गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. असं असलं तरी कंपनीचं मूल्यांकन हे अधिक असल्याचं काही जाणकारांचं म्हणणं आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी यात कोणती आव्हानं आहेत हेदेखील समजून घेणं महत्त्वाचं आहे. लेन्सकार्टचा आयपीओ खूप महागडा दिसतोय. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की कंपनीचं मूल्यांकन कंपनीच्या पुढील वर्षाच्या अंदाजित नफ्याच्या २०० पट जास्त आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना कंपनीकडून जलद वाढीची अपेक्षा आहे. पण हे सर्व कंपनीच्या कामगिरीवरच अवलंबून आहे.
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
काय म्हणाले एक्सपर्ट?
"कंपनीची आतापर्यंतची कामगिरी तशी चांगलीच आहे. परंतु त्यांचा नफा मात्र जास्त नाहीये. अशातच ही वाढ जर अपेक्षा पूर्ण करणारी नसेल तर उच्च मूल्यांकनावर गुंतवणूक करणं थोडं धोक्याचं ठरू शकतं. परंतु लेन्सकार्टचा थेट स्पर्धक म्हणजे टायटन आय प्लस. त्यांची देशात स्टोअर्स जरी कमी असली तरी त्यांचा नफा मात्र लेन्सकार्टपेक्षा अधिक आहे. परंतु लेन्सकार्टसाठी जमेची बाजू म्हणजे त्यांच्यासोबत जोडलं गेलेलं राधाकिशन दमनी यांचं नाव. त्यांनी आयपीओपूर्वी या कंपनीत ९० कोटींच्या आसपास गुंतवणूक केली आहे आणि ते लाँग टर्म इनव्हेस्टर म्हणून ओळखले जातात. पुढे ते आणखीही गुंतवणूक वाढवण्याची शक्यतादेखील आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा एक विश्वास ठरू शकतो," असं एका इनव्हेस्टमेंट बँकरनं लोकमतशी बोलताना सांगितलं.
"प्राईज बँडच्या अपर लेव्हलवर कंपनीचं बाजार भांडवल सुमारे ७०,००० कोटी रुपयांच्या जवळ असेल. १०x EV/Sales मल्टीपलवर हे मूल्यांकन मिड टर्मच्या दृष्टीनं थोडं महागडं मानलं जाऊ शकतं. टायटन आय प्लस यांची थेट स्पर्धक असली आणि नफा जरी अधिक असला तरी कंपनीकडून देण्यात येणाऱ्या ऑफर्स आणि स्टोअर्सची संख्या यामुळे लोकांची पसंतीही लेन्सकार्टला मिळत आहे. याशिवाय तुलनेनं प्रोडक्टच्या किंमतीही कमी आहेत. त्यामुळे भविष्यात त्यांचा व्यवसाय अधिक नफ्यात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शॉर्ट टर्म किंवा मिड टर्ममध्ये गुंतवणूक करण्याऐवजी जर लाँग टर्मचा विचार करुन गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूकदार याचा विचार करू शकतात. पुढे जाण्यासाठी कंपनी आपला नफा इंटरनॅशनल पियर्सच्या पातळीवर किती चांगल्या प्रकारे वाढवू शकते हे पाहण्याची मुख्य गोष्ट असेल," असंही त्यांनी लोकमतला सांगितलं.
ग्राहकांपर्यंत मोठी पोहोच
कंपनीचे जगभरात एकूण २,८०६ फिजिकल स्टोअर्स आहेत, ज्यात भारतात २,१३७ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ६६९ आहेत. लेन्सकार्ट जॉन जेकब्स, ओनडेज, व्हिन्सेंट चेस आणि लेन्सकार्ट एअर यासारख्या अनेक ब्रँड अंतर्गत उत्पादनं देखील विकते.
मजबूत पुरवठा साखळी आणि उत्पादन
लेन्सकार्टनं सेंट्रलाईज्ड उत्पादन आणि लॉजिस्टिक्स प्रणाली स्वीकारली आहे. लेन्सकार्ट त्याच्या प्रिस्क्रिप्शन आयग्लासेसपैकी सुमारे ७०% स्वत:च तयार करते. हे मॉडेल जलद डिलिव्हरी आणि उत्तम प्राईज कंट्रोलमध्येही मदत करते. भविष्यात, कंपनी सिंगापूर आणि यूएई सारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये हे मॉडेल विस्तारित करण्याची योजना आखत आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती कशी?
कंपनीचं EBITDA मार्जिन आर्थिक वर्ष २३ मध्ये ७% वरून आर्थिक वर्ष २५ मध्ये १४.७% पर्यंत वाढलं, तर आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत ते १७.७% पर्यंत पोहोचलं.
"मला मूल्यांकन समजत नाही"
"मला मूल्यांकन कसे योग्य ठरवायचे हे समजत नाही. सर्वात कमी किमतीत सर्वोत्तम दर्जाचे चष्मे कसे बनवायचे, याच ग्राहकांच्या मूल्याचं मी गेल्या १५ वर्षापासून समर्थन करत आहे. मी पुढील २०-३० वर्षे तेच करेन. मला हे मूल्यांकन समजतही नाही," असं लेन्सकार्टचे संस्थापक पीयूष बन्सल म्हणाले.
EDची नजर
गुरुग्राममधील सक्तवसूली संचालनालयानं (ईडी) लेन्सकार्टकडून परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) अंतर्गत माहिती आणि कागदपत्रे मागितली आहेत. कंपनीनं त्याचं पालन केलं असलं तरी, रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स असा इशाराही देतं की भविष्यात नियामक कारवाईची शक्यता नाकारता येत नाही, ज्यामुळे तिची प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थिती प्रभावितही होऊ शकते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Lenskart's IPO aims for ₹70,000 crore valuation. Experts debate if it's justified, citing high price-to-earnings ratio. Despite challenges, Radha Kishan Damani's investment boosts confidence. Long-term investors should consider international growth potential.
Web Summary : लेन्सकार्ट का आईपीओ ₹70,000 करोड़ का मूल्यांकन चाहता है। विशेषज्ञों का मानना है कि यह उचित है या नहीं, क्योंकि मूल्य-से-आय अनुपात अधिक है। चुनौतियों के बावजूद, राधा किशन दमानी का निवेश विश्वास बढ़ाता है। दीर्घकालिक निवेशक अंतर्राष्ट्रीय विकास क्षमता पर विचार करें।