Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये

By जयदीप दाभोळकर | Updated: April 29, 2025 12:27 IST

Mukesh Ambani Earning: रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे ४४,२९३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. पाहूया काय आहे यामागचं कारण.

Mukesh Ambani Earning: रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत एका दिवसात ५.२० अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. रुपयांमध्ये पाहायचं झालं तर त्यांनी एका दिवसात सुमारे ४४,२९३ कोटी रुपयांची कमाई केली. ८५.१८ रुपये प्रति डॉलरनुसार याची गणना करण्यात आलीये. सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये बंपर वाढ झाल्यानं अंबानींच्या संपत्तीत ही वाढ झाली आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी आता एका स्थानाची झेप घेत १६ व्या स्थानावर पोहोचलेत. त्यांची एकूण संपत्ती ९९.२ अब्ज डॉलर्स आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्समध्ये अंबानी सोमवारी टॉप गेनर ठरले. यासह मुकेश अंबानी या वर्षी भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशही बनलेत. या वर्षी त्यांनी आपल्या संपत्तीत ८.५८ अब्ज डॉलरची भर घातली.

अंबानी यांच्यापाठोपाठ बर्नार्ड अर्नाल्ट यांनी आपल्या संपत्तीत ३.१८ अब्ज डॉलर्स जोडले. तर वांग निंग आणि लॅरी एलिसन अनुक्रमे १.६८ अब्ज डॉलर आणि १.६४ अब्ज डॉलर्सची कमाई केली. अंबानींचा व्यवसाय अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे आणि मार्च २०२४ पर्यंतच्या वर्षात समूहाचे उत्पन्न १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होतं. ते मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाचे मालकही आहेत.

'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 

अदानींच्या संपत्तीतही वाढ

सोमवारी अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्येही तेजी दिसून आली. यासोबतच अदानी यांची संपत्तीही १.४८ अब्ज डॉलर्सनं वाढून ७७.५ अब्ज डॉलर्स झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्समध्ये अदानी आता २० व्या स्थानावर आहेत. एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने हुआंग यांना सोमवारी २.०२ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं. यामुळे त्यांचं रँकिंग कमी झालं आणि अंबानींनी त्यांना १७ व्या स्थानावर ढकललं.

संपत्ती का वाढली?

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे शेअर्स संपत्तीच्या तेजीमागे आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये सोमवारी जोरदार खरेदी झाली. एनएसईवर आरआयएलचा शेअर १,३७४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मार्च २०२५ मध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २ टक्क्यांनी वाढून १९,४०७ कोटी रुपये झाला आहे, जो १८,४७१ कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ५.०७ टक्क्यांच्या बंपर वाढीसह १३६६.३० रुपयांवर बंद झाला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स