Join us

₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:57 IST

Mukesh Ambnai Investment: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) आपल्या बेवरेज ब्रँडवर मोठी गुंतवणूक करणार आहे. येत्या १२ ते १५ महिन्यांत कंपनी ८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.

Mukesh Ambnai Investment: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) आपल्या बेवरेज ब्रँडवर मोठी गुंतवणूक करणार आहे. येत्या १२ ते १५ महिन्यांत कंपनी ८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. कॅम्पा आणि इतर पेयांचं उत्पादन वाढविण्यासाठी ही गुंतवणूक केली जाणारे.

रिलायन्स कन्झ्युमरला या गुंतवणुकीद्वारे बाजारात आपली पकड मजबूत करायचीये. रिलायन्स कन्झ्युमर कोका-कोला आणि पेप्सिको सारख्या बड्या कंपन्यांना टक्कर देण्यास तयार आहे. त्याचबरोबर देशभरातील छोट्या, प्रादेशिक ब्रँड्सना आव्हान देण्याचेही कंपनीचे उद्दिष्ट आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी सुमारे १०-१२ नवीन कारखाने सुरू करण्याची योजना आखत आहे. काही कारखाने कंपनीच उभारणार असून काही इतर कंपन्यांसोबत मिळून काम करणार आहेत.

अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

आतापर्यंतची मोठी गुंतवणूक

आरसीपीएलची ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. आरसीपीएलनं २०२२ मध्ये रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची उपकंपनी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ही गुंतवणूक रिलायन्स आणि त्याचे काही भागीदार संयुक्तपणे करत असल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं. एकूण ६००० ते ८००० कोटींची गुंतवणूक होणार आहे.

बिहारमध्येही प्रकल्प

फेब्रुवारी महिन्यात रिलायन्सनं गुवाहाटीमध्ये प्लांट सुरू केला होता. जेरिको फूड्स अँड बेव्हरेजेस एलएलपी या स्थानिक कंपनीच्या सहकार्यानं हा प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्लांटमध्ये सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकेज्ड वॉटरचं काम होतं. हा प्रकल्प ईशान्य भागातील गरजा पूर्ण करतो. दरम्यान, कंपनी आता बिहारमध्ये आणखी एक प्लांट उभारणार आहे.

आतापर्यंत १८ प्लांटमध्ये कॅम्पा आणि इतर पेये तयार केली जात आहेत. हे सर्व प्रकल्प सहगुंतवणुकीअंतर्गत उभारण्यात आले आहेत. म्हणजेच रिलायन्ससोबत इतर कंपन्यांनीही त्यात पैसे गुंतवले आहेत.

पोर्टफोलिओत अनेक ब्रँड्स

रिलायन्स कन्झ्युमर कंपनीही सिल जॅम आणि स्प्रेडची निर्मिती आणि विक्री करते. याशिवाय लोटस चॉकलेट, टॉफीमन आणि रावळगाव सारख्या कन्फेक्शनरी ब्रँडचाही कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश आहे. कंपनी अॅलन्स बिगल्स स्नॅक्स, वेलवेट शॅम्पू आणि इंडिपेंडेंस स्टेपल्स सारखे ब्रँड देखील बनवते. कंपनीनं १५ पैकी बहुतांश ब्रँड खरेदी केले आहेत. तथापि, कंपनीचे ब्रँड अजूनही काही बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. मार्च २०२७ पर्यंत देशभरात आपले सर्व कन्झुमर प्रोडक्ट उपलब्ध व्हावेत, अशी कंपनीची इच्छा आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीव्यवसाय