Join us

Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:05 IST

Lenskart IPO: चष्मा, लेन्स आदी आयकेअर उत्पादनं बनवणाऱ्या लेन्सकार्ट या कंपनीनं लवकरच शेअर बाजारात उतरण्याची पूर्ण योजना आखली आहे. गुरुग्रामस्थित ही कंपनी लवकरच आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.

Lenskart IPO: चष्मा, लेन्स आदी आयकेअर उत्पादनं बनवणाऱ्या लेन्सकार्ट या कंपनीनं लवकरच शेअर बाजारात उतरण्याची पूर्ण योजना आखली आहे. गुरुग्रामस्थित ही कंपनी लवकरच आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं ३० मे रोजी झालेल्या बैठकीत लेन्सकार्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचं नाव बदलून लेन्सकार्ट सोल्युशन्स लिमिटेड करण्याचा विशेष ठराव मंजूर केला, तसंच १ अब्ज डॉलर्सच्या (सुमारे ८,५०० कोटी रुपये) आयपीओला मंजुरी दिली.

हे पाऊल लेन्सकार्टच्या एक किंवा अधिक भारतीय स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्ट होण्याचे संकेत देत आहे. दरम्यान, कंपनीनं अद्याप इश्यूची साईज किंवा वेळ जाहीर केलेली नाही. लेन्सकार्टनं आपल्या फायलिंगमध्ये, नाव बदलल्यानं प्रस्तावित आयपीओसाठी पुढे जाणं शक्य होईल, असं म्हटलं. लेन्सकार्ट आपली आयपीओ प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोटक महिंद्रा कॅपिटल, अॅक्सिस कॅपिटल, सिटी, मॉर्गन स्टॅनली आणि एव्हेंडस कॅपिटलसह अनेक बँकर्सच्या कन्सोर्टियमची नियुक्ती करू शकते, अशी माहिती यापूर्वी मनीकंट्रोलनं दिली होती.

खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स

केव्हा सुरू झाली कंपनी?

२००८ मध्ये पियुष बन्सल, अमित चौधरी, नेहा बन्सल आणि सुमीत कपाही यांनी लेन्सकार्टची स्थापना केली होती. लेन्सकार्ट ऑनलाइन उपस्थिती आणि २,००० हून अधिक रिटेल स्टोअरसह भारतातील सर्वात मोठा ओम्नी-चॅनेल आयवेअर ब्रँड बनला आहे. कंपनी २०१९ मध्ये युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाली आणि सॉफ्टबँक, टेमासेक, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (एडीआयए), अल्फा वेव्ह ग्लोबल, केकेआर, केदारा कॅपिटल आणि टीपीजी सारख्या प्रमुख गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक केली आहे.

४३,८०० कोटींची कंपनी

लेन्सकार्टनं जून २०२४ मध्ये टेमासेक आणि फिडेलिटीकडून २० कोटी डॉलर्सचा निधी जमा केला, ज्यामुळे कंपनीचं मूल्यांकन ५ अब्ज डॉलर्सच्या (सुमारे ४३,००० कोटी रुपये) पुढे गेलं. मात्र, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचे आर्थिक निकाल घसरले. रेग्युलेटरी फाइलिंगनुसार, ५,४२७ कोटी रुपयांच्या ऑपरेटिंग रेव्हेन्यूवर कंपनीला १० कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. यापूर्वी ही कंपनी नफ्यात होती.

टेक सेक्टरचा मोठा आयपीओ

लेन्सकार्टचा आयपीओ केवळ कन्झ्युमर ब्रँडसाठी गुंतवणूकदारांची आवड दर्शवणारा नाही तर कंपनीच्या बाजारात एन्ट्री करण्याच्या दीर्घकाळाच्या प्रयत्नांना एक नवीन आयाम देईल. जर आयपीओ यशस्वी झाला तर भारतातील आयवेयर क्षेत्रात लेन्सकार्टचं स्थान आणखी मजबूत होईल. गेल्या डिसेंबरमध्ये, लेन्सकार्टनं तेलंगणा सरकारसोबत उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी सुमारे १,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा करार केला आहे. या युनिटमुळे सुमारे २,१०० लोकांना थेट रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक