बॉलीवूड स्टार्स आणि क्रिकेटपटूंची उत्सुकता आता शेअर बाजारात वाढली आहे. सुपरस्टार्स आता मोठ्या पडद्यावर आणि मैदानावरच नव्हे तर शेअर बाजारातही आपलं नशीब आजमावत आहेत. त्यामुळेच ते आता कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. रणबीर कपूर, आमिर खान, करण जोहर, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनीही करमतारा इंजिनीअरिंगमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीनं आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे मसुदा कागदपत्रं सादर केली आहेत. सोलर माउंटिंग स्ट्रक्चर आणि ट्रॅकर कंपोनेंट्सची निर्मिती करणाऱ्या या कंपनीनं जानेवारीमध्ये सेबीकडे आयपीओसाठी अर्ज सादर केला होता. आयपीओच्या माध्यमातून सुमारे १,७५० रुपये उभारण्याची तयारी कंपनीनं केली आहे.
कंपनीचे प्रवर्तक तनवीर सिंग आणि राजीव सिंग यांनी सांगितलं की, सेकंडरी सेलद्वारे एकूण ३४.०९ लाख शेअर्स अनेक गुंतवणूकदारांना हस्तांतरित करण्यात आले आहेत. हे शेअर्स ३१० रुपये प्रति शेअर दरानं विकले गेले आहेत. रणबीर कपूर, आमीर खान, करण यश जोहर, बिमल पारेख, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांच्यासह चित्रपट आणि क्रिकेट जगतातील अनेकांनी २५ एप्रिल रोजी कंपनीत ३०.०३ कोटी रुपयांचे ९,६८,९१० इक्विटी शेअर्स खरेदी केलेत. या खरेदीनंतर करमताराचं मूल्यांकन सुमारे १०,४११ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
आयपीओच्या माध्यमातून १७५० कोटी जमवणार
करमतारा इंजिनीअरिंगनं आयपीओच्या माध्यमातून १,७५० कोटी रुपये उभे करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. या इश्यूमध्ये १,३५० कोटी रुपयांचे शेअर्स नव्यानं जारी करणे आणि ४०० कोटी रुपयांच्या ऑफर फॉर सेलचा (OFS) समावेश आहे. कंपनीचे प्रवर्तक तनवीर सिंग आणि राजीव सिंह ओएफएसच्या माध्यमातून २००-२०० कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत. जानेवारी २०२५ मध्ये करमतारा इंजिनीअरिंगनं ३१० रुपये प्रति शेअर या दरानं प्रिफरेंशियल अलॉटमेंटच्या माध्यमातून ३०७ कोटी रुपयांचा निधी गोळा केला. त्यावेळी गुंतवणूकदारांमध्ये सिंगलॅलिटी ग्रोथ अपॉर्च्युनिटीज फंड, क्वांटम स्टेट इन्व्हेस्टमेंट फंड, अनंता कॅपिटल, गौरव त्रेहान यांसारख्या बड्या नावांचा समावेश होता.
कंपनी काय करते?
मुंबईस्थित करमतारा इंजिनिअरिंग सोलार आणि ट्रान्समिशन लाईन गियरचं उत्पादन करते. हा एक बॅकवर्ड इंटिग्रेटेड प्लेअर आहे. बाजारात ही कंपनी इनॉकस विंड, कंपनी ग्रीन आणि सुझलॉन एनर्जी सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करते. नोव्हेंबर २०२४ पर्यंत कंपनीवर एकूण ₹५८६.४ कोटी रुपयांचं कर्ज होतं आणि ₹७३३.६ कोटीची क्रेडिट देणी होती. कंपनीनं सेबीकडे दाखल केलेल्या डीआरएचपीनुसार, कंपनी आयपीओमधून उभारलेल्या निधीतून ₹१,०५० कोटी कर्ज फेडण्यासाठी वापरेल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)