Join us

₹१३६ वरुन आपटून ₹१६ वर आला 'हा' शेअर; आता SEBI ची मोठी कारवाई, शेअर विकण्यासाठी रांग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:45 IST

JP Power Share Price : कंपनीचा शेअर सुरुवातीच्या व्यवहारात ८ टक्क्यांहून अधिक घसरून १६.६१ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. शुक्रवारी हा शेअर १८.१४ रुपयांवर बंद झाला होता.

JP Power Share Price : जयप्रकाश पॉवरचा शेअर सोमवारी (३० डिसेंबर) घसरणीसह व्यवहार करत होते. कंपनीचा शेअर सुरुवातीच्या व्यवहारात ८ टक्क्यांहून अधिक घसरून १६.६१ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. शुक्रवारी हा शेअर १८.१४ रुपयांवर बंद झाला होता. बाजार नियामकानं कंपनीला दंड ठोठावल्यानंतर जेपी पॉवरच्या शेअरच्या किंमतीत घसरण दिसून आली. सेबीनं दिलेल्या माहितीनुसार, जेपी पॉवरचे एमडी आणि सीईओ सुरेश जैन आणि इतरांना आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली दंड ठोठावण्यात आला आहे.

काय आहेत डिटेल्स?

जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेन जैन आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना सेबीनं शुक्रवारी एकूण ५४ लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर सेबीनं ४५ दिवसांत दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत. सेबीने दंड ठोठावलेल्या अन्य अधिकाऱ्यांमध्ये कंपनीचे अध्यक्ष मनोज गौर, कार्यकारी संचालक सुनील कुमार शर्मा आणि प्रवीण कुमार सिंह, मुख्य वित्तीय अधिकारी आर. के. पोरवाल आणि माजी पूर्णवेळ सदस्य एम. के. व्ही. रामाराव यांचा समावेश आहे. सेबीनं आपल्या ८९ पानांच्या आदेशात, त्यांना ४५ दिवसांच्या आत दंड भरण्याचे निर्देश देण्यात आल्याचं म्हटलंय.

काय आहे प्रकरण?

नियामकानं जेपी समूहातील कंपनी जयप्रकाश पॉवर वेंचर्स लिमिटेडची (जेपीव्हीएल) पीएफयूटीपी (फसव्या आणि अनुचित व्यापार पद्धती प्रतिबंधक) आणि एलओडीआर (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) नियमांचं संभाव्य उल्लंघन शोधण्यासाठी चौकशी केली होती. आर्थिक वर्ष २०१२-१३ ते २०२१-२२ या कालावधीत संगम पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (एसपीजीसीएल), जेपी अरुणाचल पॉवर लिमिटेड (जेएपीएल) आणि जेपी मेघालय पॉवर लिमिटेड (जेएमपीएल) मधील गुंतवणुकीचं योग्य मूल्यावर मोजमाप न केल्यानं कंपनीनं आपली खाती फुगवल्याचं सेबीला आढळल्याचं सेबीनं म्हटलंय.नियामकानं जयप्रकाश पॉवर व्हेंचर्सला १४ लाख रुपये, जैन, गौड, शर्मा आणि सिंग यांना प्रत्येकी ७ लाख रुपये आणि पोरवाल आणि राव यांना प्रत्येकी ६ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

कंपनीच्या शेअर्सची स्थिती

जेपी पॉवरचा शेअर गेल्या पाच दिवसांत ७ टक्के तर एका महिन्यात ६ टक्क्यांनी घसरला. सहा महिन्यांत त्यात ११ टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, यंदा त्यात आतापर्यंत १९ टक्के वाढ झाली आहे. पाच वर्षांत या शेअरमध्ये ९३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्याचबरोबर दीर्घकालीन नुकसानही झालं आहे. २८ डिसेंबर २००७ रोजी कंपनीचे शेअर्स १३६ रुपयांवर होते. म्हणजेच त्यानंतर त्यात जवळपास ८८ टक्क्यांची घसरण झाली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक