Join us  

अदानींच्या संकटकाळात दिलेली साथ, त्याच कंपनीनं आता Vodafone-Idea ला दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 11:48 AM

हिंडेनबर्गनंतर अदानी समूहासाठी संकटमोचक ठरलेल्या कंपनीनं आता व्होडाफोन आयडिलाही मदतीचा हात दिलाय.

Vodafone Idea News: हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहासमोर मोठं संकट उभं राहीलं होतं. या रिपोर्टनंतर अदानी समूहाला मोठा आर्थिक फटकाही बसला होता. परंतु त्या काळात एका व्यक्तीनं त्यांना मदतीचा हात दिला होता. जीक्युजी पार्टनर्सनं (GQG Partners) अदानी समूहाला संकटाच्या काळात गुंतवणूक करून मदत केली होती. आता याच कंपनीनं दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिलायाही (VIL) मदतीचा हात दिलाय. जीक्युजी पार्टनर्सनं व्होडाफोन आयडियामध्ये गुंतवणूक केली आहे. मेगा एफपीओ ओपनिंग पूर्वीच व्होडाफोन आयडियानं आपलं अँकर बुक वाटप बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीनं आघाडीच्या जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून अंदाजे ५,४०० कोटी रुपये उभे केले आहेत. 

जीक्युजी पार्टनर्सशिवाय अँकर बुक सबस्क्राईब करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये युबीएस, मॉर्गन स्टॅनले इंडिया इनव्हेस्टमेंट फंड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स मॉरिशस, गोल्डमॅन सॅक्स आणि फिडेलिटी यांचा समावेश आहे. 

कंपनीनं काय म्हटलं? 

भांडवल उभारणीच्या समितीनं अँकर गुंतवणूकदारांना कंपनीचे ४९०.९ कोटी इक्विटी शेअर्स वाटप करण्यास मान्यता दिली आहे. १६ एप्रिल २०२४ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. यामध्ये, बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून अँकर गुंतवणूकदारांना ४,९०,९०,९०,९०८ इक्विटी शेअर्सचं वाटप निश्चित करण्यात आले. अँकर गुंतवणूकदारांना अलॉकेशन प्राईज ११ रुपये प्रति इक्विटी शेअर आहे, असं कंपनीनं बीएसई फाइलिंगमध्ये म्हटलंय. 

देशातील सर्वात मोठा एफपीओ? 

रोखीच्या अडचणीत असलेल्या वोडाफोन आयडियानं १० ते ११ रुपये प्रति शेअर या किंमतीच्या बँडवर १८,००० कोटी रुपयांची फॉलो-ऑन पब्लिक ऑफरची घोषणा केली आहे. देशातील हा सर्वात मोठा एफपीओ आहे.

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)शेअर बाजार