Join us

'₹२२६ पर्यंत जाऊ शकतो 'हा' शेअर,' रेखा झुनझुनवालांकडे आहेत कंपनीचे ८ कोटींपेक्षा अधिक शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:15 IST

Federal Bank Share: दिग्गज दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक मोठे शेअर्स आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओतील या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.

Federal Bank Share: दिग्गज दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक मोठे शेअर्स आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओतील एक महत्त्वाचा शेअर म्हणजे फेडरल बँकेचा शेअर (Federal Bank Share). फेडरल बँकेचा शेअर सोमवारी २ टक्क्यांहून अधिक वधारला आणि इंट्राडे उच्चांकी पातळीवर १८३.३५ रुपयांवर पोहोचला. आगामी काळात खासगी बँकेचा हा शेअर फोकसमध्ये राहू शकतो. 

नुकत्याच झालेल्या धोरणात्मक बैठकीत फेडरल बँकेने एमडी आणि सीईओ केव्हीएस मनियन यांच्या नेतृत्वाखाली पुढील ३ वर्षांचा रोडमॅप शेअर केला आहे. आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत बँकेचा रिटर्न ऑन अॅसेट्स (ROA) टॉप पहिल्या सहा बँकांच्या पातळीवर आणण्यासाठी १२ विषयांवर प्रकाश टाकण्यात आलाय. कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे ८,७७,८०,५३६ शेअर्स असून कंपनीत त्यांचा ३.६१ टक्के हिस्सा आहे.

काय आहेत अधिक डिटेल्स?

बँक स्वतःला पहिल्या ६ खाजगी बँकांसह बेंचमार्क करत आहे आणि विविध निकषांवर पहिल्या तीन खाजगी बँकांमध्ये स्वत:ला आणण्याचं उद्दिष्ट ठेवत आहे. 'रणनीती चांगली तयार झाली असून सर्वांच्या नजरा पुढील अंमलबजावणीकडे आहेत,' असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आयआयएफएल सिक्युरिटीजनं म्हटल्यानुसार, "आम्ही आमच्या अंदाजात सुधारणा केली आहे आणि एसओटीपी-आधारित टार्गेट २१८ रुपये (२१ टक्क्यांनी) वाढवलं आहे. आम्ही आमचे रेटिंग बाय रेटिंगमध्ये अपग्रेड केले आहे."

काय आहे टार्गेट प्राईज?

९३ वर्षांचा वारसा, केरळमधील अग्रगण्य उपस्थिती आणि अधिक व्यापक बँक बनण्यावर नव्यानं लक्ष केंद्रित करणारी फेडरल बँक शाश्वत विकास, नफा आणि तांत्रिक प्रगतीच्या मार्गावर पाऊल टाकत आहे, असं एमओएफएसएलनं म्हटलंय. एमओएफएसएलने फेडरल बँकेच्या शेअरवर २२५ रुपयांचे टार्गेट प्राइस देत खरेदीची शिफारस केली. निर्मल बंग इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं फेडरल बँकेवर २२६ रुपयांच्या टार्गेट प्राइससह 'बाय' कायम ठेवलं आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रेखा झुनझुनवालागुंतवणूक