Join us  

ज्युनिपर हॉटेल्सच्या शेअर्सचं निराशाजनक लिस्टिंग, आयपीओलाही मिळालेला थंड प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 10:40 AM

लक्झरी हॉटेल निर्माता ज्युनिपर हॉटेल्सच्या शेअर्सची आज शेअर बाजारात एन्ट्री झाली.

Juniper Hotels IPO Listing: लक्झरी हॉटेल निर्माता ज्युनिपर हॉटेल्सच्या शेअर्सची आज शेअर बाजारात एन्ट्री झाली. कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून थंड प्रतिसाग मिळाला होता आणि प्रत्येक कॅटेगरीसाठी असलेला आरक्षित हिस्साही पूर्णपणे सबस्क्राईब झाला नव्हता.  

आयपीओ अंतर्गत 360 रुपयांच्या किमतीत शेअर्स जारी करण्यात आले आहेत. आज कंपनीचे शेअर्स बीएसईवर 361.20 आणि NSE वर 365 रुपयांवर लिस्ट झाले. याचा अर्थ आयपीओच्या गुंतवणूकदारांना सुमारे 1 टक्के (Juniper Hotels Listing Gain) लिस्टिंग फायदा झाला आहे. लिस्ट झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली. तो एनएसई वर 381.70 (Juniper Hotels Share Price) वर गेला, याचा अर्थ गुंतवणूकदारांना नंतर 6.02 टक्के नफा मिळाला. 

मिळालेला थंड प्रतिसाद 

जुनिपर हॉटेल्सचा 1,800 कोटी रुपयांचा आयपीओ 21-23 फेब्रुवारी दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून थंड प्रतिसाद मिळाला आणि आरक्षित हिस्साही पूर्णपणे सबस्क्राईब झाला नाही. एकूण 2.18 पट हा आयपीओ सबस्क्राईब झाला. यामध्ये, क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा (QIB) हिस्सा 3.11 पट, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा (NII) हिस्सा 0.89 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव हिस्सा 1.31 पट सबस्क्राईब झाला होता. या IPO अंतर्गत 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेले 5 कोटी नवीन शेअर्स जारी करण्यात आले. या शेअर्सद्वारे उभारलेले पैसे कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरले जातील. 

कंपनीची आर्थिक स्थिती 

कंपनीच्या आर्थिक स्थितीविषयी बोलायचं झालं तर, 2023 च्या आर्थिक वर्षात कंपनीला 1.5 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. दरम्यान, आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीला 188 कोटी रुपयांचा तोटा झाला. या कालावधीत, कंपनीचा परिचालन महसूल 308.7 कोटी रुपयांवरून जवळजवळ दुप्पट होऊन 666.85 कोटी रुपये झाला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांना सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारहॉटेलशेअर बाजार