Join us  

अनिल अंबानींच्या कंपनीची जिंदाल सोबत डील, कर्जमुक्त होण्यावर फोकस; ₹२५ चा आहे शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 1:37 PM

Anil Ambani Reliance Power : जेएसडब्ल्यू एनर्जीनं रिलायन्स पॉवरसोबत एक मोठा करार केला आहे.

जिंदाल समूहाची कंपनी जेएसडब्ल्यू एनर्जीनं अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या विंड एनर्जी प्रोजेक्टचं अधिग्रहण केलं आहे. खरं तर, जेएसडब्ल्यू एनर्जीचं युनिट जेएसडब्ल्यू रिन्युएबल एनर्जीनं रिलायन्स पॉवरचा महाराष्ट्रातील ४५ मेगावॅटचा विंड एनर्जी प्रोजेक्ट १३२ कोटी रुपयांना विकत घेण्यासाठी करार केला आहे. 

रिलायन्स पॉवरनं शुक्रवारी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये यासंदर्भातील माहिती दिली. जेएसडब्ल्यू रिन्युएबल एनर्जी (कोटेड) लिमिटेड ही JSW निओ एनर्जी लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. हा करार २१ मे २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचं यात नमूद करण्यात आलंय. 

कर्जमुक्त होण्यावर फोकस 

रिलायन्स पॉवरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रीतून मिळालेले पैसे कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जमुक्त कंपनी बनण्याचं रिलायन्स पॉवरचं उद्दिष्ट आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत रिलायन्स पॉवरचं एकूण कर्ज सुमारे ७०० कोटी रुपये होतं. रिलायन्स पॉवर बँकांच्या थकीत कर्जाची परतफेड करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यांमध्ये त्यांनी डीबीएस बँक,आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेसोबतचं कर्ज फेडलं आहे 

शेअरमध्ये अपर सर्किट 

अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सातत्यानं अपर सर्किट लागत आहे. गेल्या शुक्रवारी हा शेअर २६.२७ रुपयांवर बंद झाला. एका दिवसाच्या आधीच्या तुलनेत स्टॉकनं ५ टक्क्यांचं अपर सर्किट हिट केलं. शेअरची मागील बंद किंमत २५.०२ रुपये होती. या शेअरनं एका आठवड्यात १८ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्स