Join us  

एक सकारात्मक बातमी आणि Paytm च्या गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला, शेअरला अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 11:43 AM

नव्या अपडेटनं स्टॉकमध्ये पुन्हा एकदा तेजी आणली आहे. आज पेटीएमचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अपर सर्किटवर पोहोचले. 

Paytm Share Price Today: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) थर्ड पार्टी ॲप प्रोव्हायडर म्हणून काम करण्यास मान्यता मिळाल्यानंतर Paytm शेअर्समधील गुंतवणूकदारांचा विश्वास परत आला आहे. एका वर्षात 998.30 वरून 318.05 रुपयांच्या नीचांकी स्तरापर्यंत घसरल्यानंतर या अपडेटनं स्टॉकमध्ये पुन्हा एकदा तेजी आणली आहे. आज पेटीएमचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अपर सर्किटवर पोहोचले.  

आज हा शेअर 370.70 रुपयांवर उघडला आणि नंतर 367.25 रुपयांपर्यंत खाली घसल्यानंतर पुन्हा 370.70 रुपयांवर पोहोचला. पेटीएमचे शेअर्स गेल्या 5 दिवसांत 8 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियामक कारवाईनंतर पेटीएमच्या शेअर्समध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. पेटीएमचा शेअर गेल्या सहा महिन्यांत 58.12 टक्क्यांनी आपटलाय. तर या वर्षात आतापर्यंत यात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 42 टक्क्यांहून अधिक तोटा सहन करावा लागला आहे. कंपनी लिस्ट झाल्यापासून, यात 76 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. 

एनसीपीआयकडून मंजुरी 

पेटीएमला मल्टी-बँक मॉडेल अंतर्गत थर्ड-पार्टी ॲप प्रोव्हायडर (TPAP) म्हणून ऑपरेट करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) मिळालेली मंजुरी हा त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा आहे. दरम्यान, हे सकारात्मक पाऊल असल्याचं विश्लेषकांनी म्हटलंय. पेटीएम आपल्या युपीआय व्यवसायासाठी चार बँक ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया लिमिटेड आणि येस बँक यांच्याशी भागीदारी करणार आहे. चार बँका पेमेंट सेवा प्रदाता म्हणून काम करतील, तर विद्यमान किंवा नवीन युपीआय ​​व्यापाऱ्यांसाठी अधिग्रहण बँक येस बँक असेल. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :पे-टीएमशेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार