Join us

महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 06:13 IST

महादेव ॲप घोटाळ्याप्रकरणी ईडीने काही लोकांना आतापर्यंत अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महादेव ॲपच्या माध्यमातून गोळा केलेल्या हजारो कोटी रुपयांपैकी एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम भारतीय शेअर बाजारात गुंतवल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली असून, त्या अनुषंगाने ईडीच्या तपासाची चक्रे फिरत असल्याची माहिती आहे.

महादेव ॲप घोटाळ्याप्रकरणी ईडीने काही लोकांना आतापर्यंत अटक केली आहे. यापैकी सुरच चोकानी नावाच्या आरोपीकडूून गुंतवणुकीची माहिती अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्याचे समजते.  याच प्रकरणात हरी शंकर टिबरेवाल नावाच्या शेअर बाजाराशी संबंधित व्यक्तीचेही नाव पुढे आले आहे. त्याने महादेव ॲपशी संबंधित स्टाय एक्स्चेंज ॲपच्या माध्यमातून कोट्यवधींची गुंतवणूक शेअर बाजारात केल्याची माहिती तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. या प्रकरणात टिबरेवाल हा फरार झाला असून त्याचा शोध सध्या तपास यंत्रणा घेत आहेत. महादेव ॲपच्या माध्यमातून गोळा झालेला कोट्यवधींचा पैसा हा हवालाच्या माध्यमातून परदेशात गेल्याचे प्रकरण यापूर्वीच ईडीचे अधिकारी तपासत आहे. 

कंपन्यांची चौकशी सुरू एक हजार कोटीच्या आसपास रक्कम ही भारतातच काही बनावट कंपन्या व बनावट बँक खाती स्थापन करून त्यात भरली गेल्याची माहिती आहे. तसेच या कंपन्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्याची कागदोपत्री दाखवले आहे. या कंपन्यांची स्थापना आणि त्यांची कागदपत्रे यांची छाननी सुरू आहे. प्राथमिक तपासात कंपन्या बनावट असून, महादेव ॲपशी निगडित पैसा शेअर बाजारात गुंतवल्याचे धागेदोरे अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

टॅग्स :धोकेबाजी