Join us  

Adani Group LIC : अदानी समूहानं भरली LIC ची झोळी, वर्षभरात करून दिली 'इतकी' कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 8:49 AM

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीनंही अदानी समूहात गुंतवणूक केलीये. अलीकडच्या काळात समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच एलआयसीलाही फायदा झालाय.

हिंडनबर्ग रिसर्चनं गेल्या वर्षी अदानी समूहाबाबत (Adani Group) एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. यानंतर समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीनंही या समूहात गुंतवणूक केली आहे. त्यावरून गदारोळही झाला होता. पण अलीकडच्या काळात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि त्यामुळे एलआयसीचीही चांगली कमाई झालीये. गेल्या एका वर्षात एलआयसीच्या अदानी समूहातील कंपन्यांमधील गुंतवणुकीचे मूल्य ५९ टक्क्यांनी वाढलंय. स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२४ रोजी एलआयसीचं अदानी समूहाच्या कंपन्यांमधील गुंतवणुकीचं मूल्य ३८,४७१ कोटी रुपये होतं, जे ३१ मार्च २०२४ रोजी ६१,२१० कोटी रुपयांवर पोहोचलं. अशा प्रकारे एलआयसीच्या गुंतवणुकीचं मूल्य एका वर्षात २२,३७८ कोटी रुपयांनी वाढलंय. 

गेल्या वर्षी २५ जानेवारी रोजी अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चनं अदानी समूहावर शेअरच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप करणारा अहवाल प्रसिद्ध केला होता. यावर बराच गदारोळ झाला आणि अदानी समूहाचं मार्केट कॅप सुमारे १५० अब्ज डॉलरनं घसरले. मात्र, अदानी समूहानं हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र यावरून राजकीय वर्तुळातही मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले. यानंतर एलआयसीनं अदानी समूहाच्या अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेस या दोन कंपन्यांमधील आपला हिस्सा कमी केला होता. गेल्या एका वर्षात या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये अनुक्रमे ८३ टक्के आणि ६८.४ टक्के वाढ झाली आहे. 

किती वाढलं मूल्य? 

अदानी समूहाच्या कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करूनही आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत, अदानी एंटरप्रायझेसमधील एलआयसीच्या गुंतवणुकीचं मूल्य ८,४९५.३१ कोटी रुपयांवरून १४,३०५.५३ कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे. या कालावधीत एलआयसीची अदानी पोर्ट्समधील गुंतवणूक १२,४५०.०९ कोटी रुपयांवरुन २२,७७६.८९ कोटी रुपये झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये अदानी ग्रीन एनर्जीमध्ये एलआयसीच्या गुंतवणूकीचं मूल्य दुप्पट होऊन ३,९३७.६२ कोटी रुपये झालं. एलआयसीच्या अदानी टोटल गॅस, अंबुजा सिमेंट्स आणि एसीसीमधील गुंतवणुकीचं मूल्यही वाढलंय.  

अदानी समूहाच्या दहा लिस्टेड कंपन्या आहेत आणि समूहाचा व्यवसाय अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे १०२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १३ व्या क्रमांकावर आहेत. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती १७.६ अब्ज डॉलर्सनं वाढली.

टॅग्स :अदानीएलआयसीगौतम अदानीगुंतवणूक