भारत सरकारकडून अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत, ज्याचा उद्देश लोकांना मदत करणं हा आहे. याशिवाय सरकारकडून अनेक योजना केवळ महिलांसाठी राबविल्या जात आहेत. देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हा या योजनांचा उद्देश आहे. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या अशा योजनांबद्दल सांगणार आहोत ज्या फक्त महिलांसाठी चालवल्या जात आहेत. चला जाणून घेऊया या योजनांबद्दल.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (एमएसएससी)
देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारनं महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू केली होती. ही एक बचत योजना आहे, ज्यामध्ये महिला गुंतवणूक करू शकतात आणि चांगला नफा कमावू शकतात. या योजनेवर ७.५ टक्के व्याज मिळतं. महिला या योजनेत जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक २ वर्षांसाठी करू शकतात. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे.
एलआयसी विमा सखी योजना
एलआयसी विमा सखी योजनेचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनविणं आहे. या योजनेअंतर्गत महिलांना एलआयसी एजंट बनण्याचे प्रशिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर दरमहा सात हजार रुपयांपर्यंत स्टायपेंडही दिलं जातं. दहावी उत्तीर्ण महिलाही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ३ वर्षांच्या प्रशिक्षणानंतर महिलांना एलआयसी एजंट बनण्याची संधी मिळू शकते.
लखपती दीदी योजना
लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून कर्ज दिलं जातं. या योजनेंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळतं. हे कर्ज व्याजमुक्त आहे. लखपती दीदी योजनेचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनविणं हा आहे.