Join us

PPF मध्ये गुंतवणूक करता? मग ५ एप्रिलची तारीख लक्षात ठेवा; वर्षभर मिळतो हा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:04 IST

PPF Investment Tips : पीपीएफमधील गुंतवणुकीची गणना महिन्याच्या ५ तारखेला केली जाते. जर गुंतवणूकदाराने या तारखेपर्यंत आपली गुंतवणूक पूर्ण केली तर त्याला संपूर्ण महिन्याचे व्याज मिळते.

PPF Investment Tips : दीर्घकालीन गुंतवणुकीचा खरा फायदा हा चक्रवाढ व्याजातूनच मिळतो. यातही सुरक्षित गुंतवणूक म्हटलं की पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF चांगला पर्याय मानला जातो. जर तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे. वास्तविक, या फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महिन्याची ५ तारीख फार महत्त्वाची आहे. जर तुम्ही तुमची मासिक गुंतवणूक ५ एप्रिलपूर्वी केली तर तुम्हाला त्या महिन्याचे पूर्ण व्याज मिळते. पण, ५ एप्रिलच्या पुढे पैसे जमा केले तर त्या महिन्याचा लाभ तुम्हाला मिळत नाही. अशा परिस्थितीत हे काम पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे ५ एप्रिल २०२५ पर्यंत वेळ आहे. ही तारीख का महत्त्वाची आहे, यापाठीमागील गणित जाणून घेऊ.

पीपीएफ सुरक्षित गुंतवणुकीचा उत्तम पर्यायबहुतेक व्यावसायिक करबचतीसाठी पीपीएफमध्ये गुंतवणूक करतात. पण, यातही तुम्ही हुशारीने पैसे गुंतवले तर तुम्हाला उत्कृष्ट परतावा मिळू शकेल. पीपीएफमध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. यात जर तुम्ही मासिक गुंतवणूक करत असाल तर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत पैसे जमा करा, जेणेकरून तुम्हाला त्या महिन्याचे व्याज देखील मिळेल. पीपीएफमधील गुंतवणुकीसोबतच मॅच्युरिटी रक्कम आणि व्याजही करमुक्त आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि दीर्घ मुदतीसाठी मोठा निधी मिळवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. PPF खात्यातील गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत १.५० लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते.

गुंतवणुकीसाठी महिन्याची ५ तारीख महत्त्वाचीतुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला PPF मध्ये एकरकमी गुंतवणूक करत असाल, तर ५ एप्रिलपर्यंत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. पीपीएफ खात्यात दर महिन्याच्या ५ तारखेला व्याज मोजले जाते. याचा अर्थ स्पष्ट आहे की जर तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या ५ एप्रिलपर्यंत एकरकमी रक्कम जमा केली तर तुम्हाला संपूर्ण महिन्यासाठी व्याजाचा लाभ मिळू शकतो.

जर एखाद्या व्यक्तीने महिन्याच्या ५ तारखेपर्यंत पीपीएफ खात्यात गुंतवणूक केली तर त्याला जमा केलेल्या रकमेवर संपूर्ण महिन्यासाठी व्याजाचा लाभ मिळतो. जर ५ तारखेनंतर गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला ५ ते ३० तारखेदरम्यान सर्वात कमी शिल्लक रकमेवरच व्याजाचा लाभ मिळू शकतो.

वाचा - घर खरेदी करावे की भाड्याने राहावे? कोणता पर्याय फायदेशीर? या गोष्टींकडे अनेकजण करतात दुर्लक्ष

गणित समजून घ्यापीपीएफ खात्यावरील व्याजाची गणना मासिक आधारावर केली जाते. याचा लाभ प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केला जातो. जर तुम्ही तुमच्या PPF खात्यात ५ एप्रिल २०२५ पूर्वी १.५ लाख रुपये जमा केले, तर त्या महिन्याचे व्याज मोजण्यासाठी संपूर्ण रक्कम विचारात घेतली जाईल. याचा अर्थ, सध्याच्या ७.१% व्याजदरावर आधारित, तुम्हाला वार्षिक १०,६५० रुपये व्याज मिळेल. मात्र, तुम्ही ५ एप्रिलनंतर पैसे जमा केल्यास तुम्हाला पहिल्या महिन्याचे व्याज मिळणार नाही. याचा अर्थ एप्रिल वगळता आर्थिक वर्षाच्या केवळ ११ महिन्यांसाठी व्याज मिळेल. व्याजदरानुसार गणना केली तर १.५ लाख रुपयांच्या ठेवीवर ९,७६२.५० रुपये होतील.

टॅग्स :पीपीएफगुंतवणूकसरकारी योजना