Join us

मुलींसाठी सिद्धीविनायक न्यासाचा पुढाकार; राबवणार ‘श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’, काय आहे ही योजना? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 13:40 IST

Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana: केंद्र आणि राज्य सरकार सातत्यानं मुलींच्या भविष्याच्या दृष्टीनं उपयुक्त अशा योजना आणत असतं. परंतु आता श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासानं (एक नवी योजना सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवलाय.

Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana: केंद्र आणि राज्य सरकार सातत्यानं मुलींच्या भविष्याच्या दृष्टीनं उपयुक्त अशा योजना आणत असतं. केंद्रानंही मुलींसाठी सुकन्या समृद्धीसारखी लोकप्रिय योजना सुरू केली आहे. परंतु आता श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासानं (Shri Siddhivinayak Ganpati Temple) एक नवी योजना सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. याचं नाव ‘श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ असं आहे. ही योजना ८ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनी जन्मलेल्या मुलींसाठी लागू असेल. या योजनेंतर्गत न्यास मुलींच्या नावानं १० हजार रुपयांची एफडी करेल.

श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाला मुलींच्या जन्माला प्रोत्साहन द्यायचं आहे. त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना आर्थिक मदतही करायची आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जन्मलेल्या मुलीच्या नावावर १० हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे. हे पैसे मुदत ठेवींच्या स्वरूपात असतील.

हा निर्णय कधी घेण्यात आला?

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली ३१ मार्च २०२५ रोजी झाली. न्यासाचे २०२४-२५ चे वार्षिक निवेदन आणि २०२५-२६ चा अर्थसंकल्पही या बैठकीत सादर करण्यात आला. ट्रस्टला ११४ कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात १३३ कोटी रुपये मिळाले. ट्रस्टच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या सिद्धिविनायक मंदिर न्यासाचं उत्पन्न गेल्या आर्थिक वर्षात (२०२४-२५) वार्षिक आधारावर १६ टक्क्यांनी वाढून १३३ कोटी रुपयांवर पोहोचलं. उत्पन्नवाढीत भाविकांनी दिलेल्या देणग्या आणि प्रसादाचा सर्वात मोठा वाटा आहे. याशिवाय पूजा आणि इतर विधींमधून २० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालं. दानपेटी, ऑनलाइन पेमेंट, विधी, प्रसाद विक्री, सोने-चांदीचा लिलाव अशा अनेक स्त्रोतांतून मंदिराला उत्पन्न मिळाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

टॅग्स :सिद्धिविनायक गणपती मंदिरगुंतवणूकमुंबई