LIC Bima Sakhi Yojana : एलआयसीची विमा सखी योजना महिलांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. आतापर्यंत ५० हजार महिलांनी यासाठी नोंदणी केलीये. महिनाभरापूर्वीच ही योजना सुरू करण्यात आली असली तरी सध्या याला उत्तम प्रतिसाद मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ डिसेंबर रोजी पानिपत येथून या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत दहावी उत्तीर्ण झालेल्या महिलांना दरमहा सात हजार रुपयांपर्यंत वेतन आणि कमिशन मिळणार आहे.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एलआयसीची ही योजना महिला सक्षमीकरणासाठी विकसित भारत अंतर्गत सुरू करण्यात आली. एलआयसीनं बुधवारी दिलेल्या माहितीनुसार ही योजना सुरू झाल्यापासून एका महिन्यात ५२५११ नोंदणी झाली आहे. यापैकी २७६९५ विमा सखींना पॉलिसी विकण्यासाठी नियुक्तीपत्र देण्यात आलंय. तर १४५८३ विमा सखींनी पॉलिसी विकण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे ही स्कीम?
या योजनेअंतर्गत महिलांना एलआयसी एजंट बनण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. या काळात दरमहा ७ हजार ते ५ हजार रुपयेही दिले जातात. तसंच पॉलिसी मिळाल्यावर कमिशनही दिलं जातं. या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी दरमहा सात हजार रुपये, दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये मानधन दिले जाते. अशा प्रकारे तीन वर्षांत एकूण २,१६,००० रुपये दिले जातील. या योजनेत तुम्हाला दरवर्षी काही टार्गेट्स पूर्ण करावी लागतात.
कोण करू शकतं अर्ज?
या योजनेत १८ वर्षे ते ७० वर्षे वयोगटातील कोणतीही दहावी उत्तीर्ण महिला अर्ज करू शकते. अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेत जाऊन माहिती मिळवू शकता. तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊनदेखील अर्ज करू शकता.