Join us

जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 17:28 IST

Jio-Airtel : कमी किमतीच्या मोबाईल डेटा प्लॅन बंद टाकल्याने वापरकर्त्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. ट्रायने कंपन्यांकडून उत्तरे मागितली आहेत.

Jio-Airtel : आजच्या काळात इंटरनेटशिवाय आपलं पानही हलणार नाही, अशी स्थिती आहे. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी मोबाइल डेटा हेच शिक्षण, सरकारी योजनांची माहिती आणि रोजच्या गरजांसाठी एकमेव साधन आहे. अशा परिस्थितीत रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांनी आपला सर्वात स्वस्त २४९ रुपयांचा १ जीबी/दिवस डेटा प्लान अचानक बंद केल्याने दूरसंचार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

ट्रायने विचारला कंपन्यांना जाबभारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) जिओ आणि एअरटेलला विचारले आहे की, त्यांनी हा सुरुवातीचा डेटा प्लान का बंद केला? हाच प्लान लाखो ग्राहकांसाठी इंटरनेट मिळवण्याचा एकमेव स्वस्त मार्ग होता. यावर जिओने स्पष्टीकरण दिले की, हा प्लान आता केवळ त्यांच्या स्टोअर्सवर ऑफलाइन उपलब्ध आहे. तर, एअरटेलने ग्राहकांचा डेटा वापर आणि बाजारपेठेतील विश्लेषणावर आधारित हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

एका कंपनीच्या अधिकाऱ्याने मिंट इंग्लिशला दिलेल्या माहितीनुसार, ५जी तंत्रज्ञान आल्यानंतर ग्राहकांची डेटाची भूक वाढली आहे. आता १ ते १.५ जीबी डेटा पुरेसा नसतो, कारण लोक जास्त व्हिडिओ पाहतात आणि ॲप्स वापरतात. त्यामुळे कमी डेटा देणारे जुने प्लान आता कामाचे राहिले नाहीत.

२९९ रुपयांचा नवा पर्यायया दरवाढीनंतर एअरटेलचा नवा एंट्री-लेव्हल प्रीपेड प्लान २९९ रुपयांचा आहे, ज्यात २८ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा मिळतो. तर, जिओ २९९ रुपयांमध्ये २८ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा देत आहे. प्लान्सचे दर वाढले असले तरी, प्रश्न हा आहे की हे वाढलेले दर सामान्य माणसाला परवडणारे आहेत का?

जेएम फायनान्शिअलच्या रिपोर्टनुसार, हा बदल कंपन्यांना ‘एव्हरेज रेव्हेन्यू पर युजर’ म्हणजेच प्रति ग्राहक सरासरी महसूल वाढवण्यासाठी करण्यात आला आहे. जिओचा एआरपीयू २०८.८ रुपये तर एअरटेलचा २५० रुपये आहे. २४९ रुपयांचा प्लान हटवल्याने जिओचा एआरपीयू ११-१३ रुपये तर एअरटेलचा एआरपीयू १०-११ रुपयांपर्यंत वाढू शकतो.

महागाई आणि ग्राहकांची चिंताकर्नाटकच्या एका खासदाराने दूरसंचार मंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना आता टेलीकॉमचे दर परवडत नसल्याचे सांगितले आहे. यूबीएसच्या रिपोर्टनुसार, भारतात सुरुवातीच्या डेटा प्लानची किंमत दरडोई उत्पन्नाच्या १.२४% आहे, जी थायलंड, चीन, मलेशियासारख्या देशांपेक्षा जास्त आहे.

मागील वर्षी जुलैमध्येही टेलीकॉम कंपन्यांनी सुमारे दोन वर्षांनंतर त्यांच्या रिचार्ज प्लान्सच्या किमती वाढवल्या होत्या. जिओने यात पुढाकार घेत आपल्या प्लान्सच्या दरात १२% ते २५% पर्यंत वाढ केली होती. तेव्हा दूरसंचार मंत्रालयानेही मान्य केले होते की, कंपन्यांनी ५जी नेटवर्कमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, त्यामुळे त्यांना दर वाढवणे आवश्यक होते.

वाचा - २४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

पुन्हा दरवाढ होणार?जेएम फायनान्शिअलने दिलेल्या माहितीनुसार, जिओच्या आयपीओची (प्रारंभिक सार्वजनिक विक्री) तयारी आणि ५जी चा वाढता वापर पाहता, येणाऱ्या काळात दर आणखी वाढू शकतात. जर दरांमध्ये वाढ झाली, तर ₹२९९ चा प्लानही भविष्यात परवडणारा राहणार नाही. 

टॅग्स :जिओएअरटेलमोबाइल