Join us  

मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 12:33 PM

Share Market Investment Mistakes : शेअर बाजारात गुंतवणूक करताना पुढील सात गोष्टींचा काळजी न घेतल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. गुंतवणूक करताना या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.

बचत केलेले पैसे आणखी वाढावे या आशेने लोक शेअर बाजाराचा पर्याय निवडत आहेत. यासाठी गुंतवणूकदार स्मॉल कॅप, लार्ज कॅप, फ्लेक्सी किंवा बॅलन्स्डसारख्या विविध म्युच्युअल फंडांचा पर्याय निवडतात. यात गुंतवणूक करताना पुढील सात गोष्टींचा काळजी न घेतल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. गुंतवणूक करताना या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. 

ध्येय निश्चितीशिवाय गुंतवणूक नको 

ही चूक सर्वजण करतात. कशासाठी गुंतवणूक याचे ध्येय निश्चित असावे. सेवानिवृत्ती, मुलाचे शिक्षण, आजारपण किया विदेशात यात्रा आदी कोणताही हेतू यामागे निश्चित करणे गरजेचे असते. 

नफ्यामागे धावणे टाळावे 

जोरदार परतावा मिळत आहे म्हणून तत्कालिक खरेदीविक्रीमध्ये पडल्यास नुकसानीची भीती असते. गुंतवणुकीमागचे मुख्य उद्देश यामुळे बाजूला पडण्याची भीती असते. नुकसान होण्याची भीती असते. 

म्युच्युअल फंडात ट्रेडिंग टाळावे 

ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी केलेली असते. मुदतीआधी हे पैसे गुंतवणूकदारांना काढता येत नाहीत. या फंडांची खरेदीविक्री केल्याने अधिक नुकसान होत असते. हा मोह टाळता आला पाहिजे. 

बाजारावर विसंबून राहू नये 

कुणाचे तरी ऐकून परताव्याच्या आशेने सतत बाजारावर लक्ष ठेवू नये. झटपट फायदा मिळवून देणाऱ्या या जाळ्यात व्यक्ती अडकून पडते. दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी हे घातक ठरत असते. 

पोर्टफोलियामध्ये वैविध्य नसणे 

गुंतवणूक विविध क्षेत्रांमध्ये करावी. एकाच क्षेत्रावर विसंबून राहणे धोक्याचे असते. नव्या नव्या क्षेत्रांचा अभ्यास करून, धोक्यांचा अंदाज घेतल्यानंतर पोर्टफोलियामध्ये वैविध्य आणले पाहिजे. 

मोठ्या फायद्याची आशा ठेवणे 

झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न बाळगल्याने निर्णय घाईगडबडीत घेतले जातात. यातून लोकप्रिय योजनांच्या आहारी जाण्याची भीती असते. यामुळे गुंतवणुकीतील शिस्त बिघडते. 

गुंतवणुकीचे मूल्यमापन न करणे 

गुंतवणुकीची वेळोवेळी समीक्षा केली पाहिजे. निश्चित केलेल्या ७ गुतवण ध्येयानुसार परतावा मिळत आहे का, याचा आढावा घेतला पाहिजे. त्यानुसार तज्ज्ञांचे मार्गदर्शन व त्यानुसार बदल केले पाहिजेत.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक