Join us  

मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताय? अनावधानानंही करू नका या ५ चुका; अन्यथा होईल नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 3:52 PM

प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचं भविष्य चांगलं आणि उज्ज्वल असावं असं वाटत असतं.

प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचं भविष्य चांगलं आणि उज्ज्वल असावं असं वाटत असतं. यामुळेच आई वडील झाल्यानंतर अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल होतात. त्यांना त्यांच्या मुलांच्या भवितव्याची काळजी वाटू लागते आणि मग त्यांच्यासाठी गुंतवणूक, बचत करणं सुरू होतं. मात्र, गुंतवणूक असो की बचत, ती योग्य वेळी सुरू केली नाही, तर त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही. चला जाणून घेऊया पालक आपल्या मुलांसाठी पैसे गुंतवताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत.

उशिरा सुरुवात करू नकागुंतवणुकीतील एक गोष्ट म्हणजे कम्पाऊंडिंग इंटरेस्ट. यामध्ये पहिल्या वर्षी मिळालेल्या व्याजावरही पुढील वर्षी व्याज मिळते. त्याच्या पुढील वर्षात, मागील सर्व वर्षांचे व्याज आणि त्यावर मिळणारे व्याज मिळते. याच्या मदतीनं तुम्ही व्याजावर व्याज मिळवू शकता. अशा परिस्थितीत मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणूक करताना लवकरात लवकर सुरुवात करणे आणि उशीर न करणं महत्त्वाचं आहे. आपलं मुल लहान आहे थोडा मोठा झाल्यावर गुंतवणूक करू असा विचार अनेकदा केला जातो. परंतु अशा परिस्थितीत तुम्ही गुंतवणूक करेपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

खर्चांचा अंदाज चुकणंभविष्यातील खर्चाचा अंदाज लावणं हे कठीण काम आहे. परंतु अनावधानानं यात चुका होऊ शकतात. भारतात विशेषतः मुलाच्या भविष्यासाठी २ गोष्टींची काळजी घेतली जाते. पहिलं मुलांचं शिक्षण आणि दुसरं त्यांचं लग्न. अशा स्थितीत मूल कधी मोठे होईल आणि त्याला शिक्षणासाठी पैशांची गरज भासेल, याची आपल्याला चांगली कल्पना असायला हवी. त्‍यांच्या लग्‍नासाठी किती पैसे खर्च करण्‍यात येतील याचाही अचूक अंदाज लावावा लागेल. अपेक्षेपेक्षा जास्त पैसे वाचवण्याचा किंवा गुंतवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही.

महागाईदरवर्षी महागाई वाढते, त्यामुळे वस्तू महाग होतात. १५ किंवा २० वर्षांनंतर गुंतवणुकीचा किंवा बचतीचा विचार करायचा असेल, तेव्हा त्याची गणना करताना महागाई लक्षात ठेवा. आज जेवढ्या पैशात शिक्षण मिळतंय, तेवढ्याच पैशांत १५-२० वर्षांनी मिळणार नाही.

गुंतवणूकीचं योग्य साधनगुंतवणुकीसाठी योग्य साधन निवडणं महत्त्वाचं आहे. समजा तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करत असाल, तर त्यानुसार गुंतवणुकीचं ठिकाण निवडावं. तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे मुलीचं शिक्षण आणि लग्न दोन्हीची व्यवस्था होऊ शकते. FD मध्ये पैसे टाकून असे करू नका किंवा शेअर मार्केटमधून कमाई करण्याचा विचार करू नका. तुम्हाला निश्चित कालावधीत खात्रीशीर परतावा हवा असेल तर तेच साधन निवडा.

स्वत:चा विचार न करणंबहुतेक पालक ही चूक करतात. पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्याची इतकी काळजी वाटते की ते स्वतःच्या भविष्याचा विचार करायला विसरतात. आपलं मुल म्हातारपणात आपला आधार बनेल या विचारानं अनेक पालक स्वत:साठी पैसे साठवत नाहीत किंवा गुंतवत नाहीत. आपल्या भविष्याचा विचार न करणं ही सर्वात मोठी चूक आहे. मुलांच्या भवितव्याची काळजी घेण्यासोबतच तुमच्या निवृत्तीचंही नियोजन करा, जेणेकरून वृद्धापकाळात कोणतीही अडचण येणार नाही.

टॅग्स :गुंतवणूकपैसा