Join us  

Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 1:07 PM

Income Tax Saving Tips: EEE श्रेणीत येणाऱ्या योजनांमध्ये ३ प्रकारे कर वाचतो. गुंतवणूक, व्याज/परतावा आणि मॅच्युरिटीमध्ये कराची बचत होते. जाणून घेऊ कोणत्या स्कीम्समध्ये घेता येऊ शकतो फायदा.

Income Tax Saving Tips: भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करणं आवश्यक आहे. हल्ली गुंतवणूकीचे अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. परंतु बहुतेक वेळा गुंतवणूकदार गुंतवणूक करताना त्यावर मिळणाऱ्या परताव्यातून कर कसा वाचवता येईल याचा विचार करतात. आज आपण अशाच काही स्कीम्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यात तुम्हाला कर सूट मिळू शकते. 

EEE चा अर्थ म्हणजे म्हणजे  Exempt Exempt Exempt. या श्रेणीत येणाऱ्या योजना तीन प्रकारे कर वाचवतात. यामध्ये दरवर्षी जमा होणाऱ्या रकमेवर कर आकारला जात नाही, याशिवाय दरवर्षी मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जात नाही आणि मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारी संपूर्ण रक्कमही करमुक्त असते. म्हणजेच गुंतवणूक, व्याज/परतावा आणि मॅच्युरिटीमध्ये कराची बचत होते. जाणून घेऊ कोणत्या स्कीम्समध्ये घेता येऊ शकतो फायदा. 

पीपीएफ - कर वाचवण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी पीपीएफ हा एक चांगला पर्याय आहे. या योजनेअंतर्गत कोणताही गुंतवणूकदार वर्षभरात कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करू शकतो. पीपीएफवर वार्षिक ७.१ टक्के व्याज मिळतं. या योजनेचं खास वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणुकीचे पैसे, गुंतवणुकीच्या पैशातून मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम हे सर्व करमुक्त आहे. 

सुकन्या समृद्धी योजना - या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला ८.२ टक्के दरानं व्याज मिळतं. या योजनेअंतर्गत आपल्या मुलीच्या खात्यात वार्षिक २५० ते १.५ लाख रुपये जमा करू शकता. १५ वर्षांसाठी पैसे जमा केले जातात आणि मुलगी २१ वर्षांची झाल्यावर व्याजासह संपूर्ण रक्कम गुंतवणूकदाराला परत केली जाते. यात गुंतवणूक करण्यासाठी मुलीचे वय १० वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम - इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीमला (ईएलएसएस) टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड असंही म्हणतात. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये तुम्ही एकरकमी पैसे जमा करू शकता आणि एसआयपीच्या माध्यमातूनही जमा करू शकता. यानंतर तुम्हाला हवं तेव्हा पैसे काढू शकता किंवा तुमची गुंतवणूक सुरू ठेवू शकता. ३ वर्षांनंतर पैसे काढल्यास तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स मिळतात. 

कर्मचारी भविष्य निर्वाह योजना - जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही ईपीएफच्या माध्यमातून तुमचा टॅक्स वाचवू शकता. ईपीएफ ही देखील ईईई श्रेणी अंतर्गत येणारी योजना आहे. सध्या यावर ८.२५ टक्के व्याज दिलं जातं. अशा परिस्थितीत तुम्ही या योजनेच्या माध्यमातून भरपूर पैसे जोडू शकता. तुम्हाला हवं असेल तर व्हीपीएफच्या माध्यमातून ही तुमचं योगदान वाढवू शकता. 

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

टॅग्स :गुंतवणूकपीपीएफपैसाइन्कम टॅक्स