Join us

चक्रवाढ व्याजाची ताकद पाहायची असेल तर 'या' स्कीम्समध्ये करू शकता गुंतवणूक, बनत राहिल पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 10:49 IST

Power of Compounding: पैसे कमवायचे असतील तर गुंतवणुकीची सवय लावा, असं म्हटलं जातं. गुंतवणुकीच्या बाबतीत ज्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळतो आणि तुमचा पैसा झपाट्यानं वाढतो अशा ठिकाणी पैसे गुंतवणं आवश्यक आहे. 

Power of Compounding: आजच्या काळात बहुतांश लोक गुंतवणुकीबाबत जागरूक आहेत. पण गुंतवणुकीच्या बाबतीत ज्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळतो आणि तुमचा पैसा झपाट्यानं वाढतो अशा ठिकाणी पैसे गुंतवणं आवश्यक आहे. 

पैसे कमवायचे असतील तर गुंतवणुकीची सवय लावा, असं म्हटलं जातं. गुंतवणुकीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकालीन योजनांचा समावेश करणं आवश्यक आहे. तुम्ही या योजनांमध्ये जितका जास्त काळ गुंतवणूक कराल तितके जास्त पैसे कमवाल. कारण दीर्घ काळात तुम्हाला कंपाउंडिंगचा चांगला फायदा मिळतो. पॉवर ऑफ कंपाउंडिंग म्हणजे काय आणि त्याचा फायदा कोणत्या स्कीम्समध्ये होऊ शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

Power of Compounding काय आहे?

खरं तर व्याज दोन प्रकारे मिळतं. साधं व्याज (Simple Interest) आणि चक्रवाढ व्याज (Compounding Interest). साध्या व्याजामध्ये तुम्हाला ठराविक काळासाठीच मूळ रकमेवर व्याज मिळतं. पण चक्रवाढ व्याजामध्ये तुम्हाला मुद्दलावर तसंच त्याच्या व्याजावर व्याज मिळतं, ज्यामुळे तुमची गुंतवणूक वेगानं दुप्पट आणि तिप्पट होते. दीर्घ मुदतीत चक्रवाढ व्याजाच्या माध्यमातून बराच निधी उभारता येतो. जाणून घ्या कोणत्या योजनांमध्ये याचा फायदा होईल.

PPF

कोणताही भारतीय नागरिक पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात गुंतवणूक करू शकतो. कर बचत आणि गुंतवणुकीचे हे जुनं आणि सुरक्षित साधन मानलं जातं. पीपीएफमधील दीर्घकालीन गुंतवणुकीत तुम्हाला कंपाउंडिंगचा फायदा मिळतो. सध्या पीपीएफवर ७.१ टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. पीपीएफमध्ये तुम्ही १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. पण ५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये त्यात वाढ करून तुम्ही तुमची गुंतवणूक पुढील वर्षांसाठी चालू ठेवू शकता आणि चांगल्या रकमेची भर घालू शकता. जर तुम्ही त्यात वर्षाला दीड लाख जमा केले आणि या योजनेला मुदतवाढ दिली आणि २५ वर्षे चालवली तर तुम्ही कोट्यधीश व्हाल हे नक्की.

SIP

म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते आणि तुम्ही ही गुंतवणूक हप्त्यांमध्ये करू शकता. तुम्ही एसआयपीमध्ये जितका जास्त काळ गुंतवणूक कराल तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही कंपाउंडिंगचा फायदा घेऊ शकाल. ज्या गुंतवणूकदारांना बाजारात थेट शेअरमध्ये पैसे गुंतवून जास्त जोखीम पत्करायची नाही, ते कमी जोखीम घेऊन एसआयपीमध्ये गुंतवणूक करू शकतात. एसआयपीवरील अंदाजित वार्षिक परतावा १२ टक्क्यांपर्यंत मानला जातो. काही वेळा ते १४ ते १५ टक्क्यांपर्यंतही मिळू शकते. एसआयपी जितकी जास्त असेल तितका नफा मोठा असतो. लाँग टाइम एसआयपीच्या माध्यमातूनही तुम्ही कोट्यवधींचा निधी जमा करू शकता.

EPF

नोकरदार लोकांसाठी ईपीएफ हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. ही एक निवृत्ती योजना आहे जी आपलं वृद्धापकाळ सुरक्षित करते. ईपीएफमध्येही तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. तसंच त्यावर मिळणारं व्याज इतर बचत योजनांच्या तुलनेत जास्त आहे. सध्या पीएफवरील व्याजदर ८.२५ टक्के आहे. आपण मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या केवळ १२ टक्के रक्कम ईपीएफमध्ये योगदान देऊ शकता. पण व्हीपीएफच्या माध्यमातून तुम्ही हे योगदान वाढवू शकता.

VPF

ईपीएफओकडून व्हीपीएफचा पर्याय निवडण्याची संधीही मिळते. याद्वारे तुम्ही पीएफमध्ये तुमचं योगदान वाढवू शकता. कर्मचारी त्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातील १०० टक्के रक्कम व्हीपीएफमध्ये गुंतवू शकतात आणि दीर्घ मुदतीसाठी त्यात मोठी रक्कम जोडू शकतात. व्हीपीएफवरही ईपीएफइतकंच व्याज मिळतं, म्हणजेच तुम्ही या गुंतवणुकीवर ८.२५ टक्के व्याज मिळवू शकता. तसंच ईपीएफचे लोक टॅक्स बेनिफिटदेखील घेऊ शकतात.

FD 

यात एकरकमी रक्कम जमा करून चक्रवाढ व्याजाचा लाभ घ्यायचा असेल तर मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करू शकता. ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक योजना मानली जाते. एफडी कोठेही, बँका किंवा पोस्ट ऑफिस सुरू करता येतात. यावर मिळणारा व्याजदरही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहे. सर्व ठिकाणचे व्याजदर पाहून कुठे गुंतवणूक करायची हे तुम्ही ठरवू शकता.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा