Join us

FD वर कसा होईल रेपो दरातील कपातीचा परिणाम? 'या' बँकेनं दिला पहिला झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 15:55 IST

रिझर्व्ह बँकेनं नुकतीच रेपो दरात कपात करत मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात २५ बेसिस पॉईंटची कपात केलीये. पण यानंतर आता एफडीच्या व्याजदरात कपात होण्यास सुरुवात झालीये.

रिझर्व्ह बँकेनं नुकतीच रेपो दरात कपात करत मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात २५ बेसिस पॉईंटची कपात केलीये. त्यामुळे रेपो रेट ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आला आहे. २०२० नंतर पहिल्यांदाच रेपो दरात कपात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेनंही व्याजदरात कपात केली होती. त्यानंतर आगामी काळात इतर देशांच्या मध्यवर्ती बँकाही व्याजदरात कपात करू शकतात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. जाणून घेऊया रेपो रेट कपातीचा तुमच्या एफडीवर काय परिणाम होईल?

रेपो दराचा परिणाम

एकीकडे रेपो रेटमुळे लोकांचा ईएमआय कमी होणार आहे. तर दुसरीकडे एफडीवर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. रेपो रेट कमी होताच बँका एफडीवरील परताव्याचा दर कमी करण्यास सुरुवात करतात. सोप्या शब्दात सांगायचं तर रेपो दरात कपात केल्यानंतर एफडीवरील परतावा होतो.

'या' खासगी बँकेनं केली कपात

खासगी क्षेत्रातील डीसीबी बँकेनं तीन कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. बँकेनं यात ६५ बेसिस पॉईंटची कपात केलीये. एफडीचे नवे दर १४ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होतील.

किती व्याज दिले जात आहे?

डीसीबी बँक आता ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर ३.७५ टक्के ते ८.०५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. बँक ७ दिवस ते १० वर्षांच्या एफडीवर हे व्याज देत आहे. १९ महिने ते २० महिन्यांच्या एफडीवर डीसीबी बँकेकडून सर्वाधिक व्याज दिले जात आहे. या कालावधीसाठी गुंतवणूकदारांना ८.०५ टक्के व्याज मिळत आहे.

कुठे कपात?

डीसीबी बँकेनं २६ महिन्यांपेक्षा जास्त परंतु ३७ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. बँकेनं या कालावधीसाठी ५५ बेसिस पॉईंट्सची कपात केली. यापूर्वी या मुदतीवरील व्याजदर ८.०५ टक्के होता. आता तो ७.५० टक्क्यांवर आला आहे. तर ३७ महिन्यांपासून ३८ महिन्यांपर्यंतच्या एफडीवरील व्याज ८.०५ टक्क्यांवरून ७.८५ टक्क्यांवर आणण्यात आलंय.

डीसीबी बँकेनं ३८ महिने आणि ६१ महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीवरील व्याजदर ८.०५ टक्क्यांवरून ७.४० टक्क्यांवर आणला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी २६ महिने आणि ३७ महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीवरील व्याजदरात ५५ बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. यापूर्वी बँक ८.५५ टक्के व्याज देत होती. आता तो ८ टक्क्यांवर आला आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना ३७ महिने ते ३८ महिन्यांच्या एफडीवर ८.५५ टक्क्यांऐवजी ८.३५ टक्के परतावा मिळणार आहे. येथे बँकेनं व्याजदरात २० बेसिस पॉईंटची कपात केली आहे.

डीसीबी बँकेनं ३८ महिन्यांपेक्षा जास्त परंतु ६१ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर ८.५५ टक्क्यांवरून ७.९० टक्क्यांवर आणला आहे. येथे बँकेनं व्याजदरात ६५ बेसिस पॉईंटची कपात केली आहे.

टॅग्स :बँकगुंतवणूक