Join us

सुकन्या समृद्धीचं बंद झालेलं अकाऊंट पुन्हा कसं सुरू कराल? जाणून घ्या फायद्याची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 14:23 IST

मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारत सरकारनं सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेत २५० रुपयांपासून कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.

मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारत सरकारनं सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेत २५० रुपयांपासून कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक सुरू करू शकता. मुलीच्या नावानं चालवल्या जाणाऱ्या या योजनेत पालकांना केवळ १५ वर्षांसाठीच गुंतवणूक करायची आहे. ही योजना २१ वर्षांनंतर मॅच्युअर होते. १० वर्षांपर्यंतच्या मुलींचे पालक या योजनेत गुंतवणूक करू शकतात.सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या ८ टक्के दराने व्याज दिलं जातं. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या योजनेत चांगली रक्कम गुंतवत राहिल्यास, तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी चांगली रक्कम जोडू शकता. परंतु जर काही कारणास्तव तुम्ही या खात्यात वार्षिक किमान रक्कम जमा करू शकत नसाल, तर खातं डीफॉल्ट मानलं जातं. अशा स्थितीत खातं बंद होते. मात्र बंद खाते पुन्हा कसं सुरू केलं जाऊ शकतं हे जाणून घेऊया.

कसं सुरू कराल खातं?तुमचं सुकन्या समृद्धी खातं काही कारणास्तव बंद झालं असेल तर तुम्ही ते पुन्हा सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही हे खातं उघडलं आहे तेथे जाऊन हे खातं पुन्हा सुरू करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मसह, जितक्या वर्षांचे पैसे भरले नाही तितक्या वर्षांचे पैसे तुम्हाला भरावे लागतील आणि तुम्हाला प्रति वर्ष ५० रुपये दंड देखील भरावा लागेल. यानंतर तुमचं खातं पुन्हा सुरू होईल.काय आहेत फायदे?

  • सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत, तुम्हाला इतर बचत योजनांच्या तुलनेत खूप चांगलं व्याज मिळतं.
  • या योजनेत तुम्ही कितीही गुंतवणूक केली तरी तुम्हाला हमखास परतावा मिळतो. बाजारातील चढउतारांसारखा यात धोका नाही.
  • तुम्हाला सुकन्या समृद्धीमध्ये गुंतवलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. म्हणजेच, मूळ रकमेव्यतिरिक्त, तुम्हाला व्याजावर व्याज देखील मिळते. अशा परिस्थितीत या योजनेद्वारे चांगला नफा मिळू शकतो.
  • तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत कुठेही हे खातं उघडलं असेल तरी तुम्ही ते देशाच्या इतर भागात सहज हस्तांतरित करू शकता.
  • तुमची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. किमान गुंतवणूक वार्षिक २५० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये आहे.
  • सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला कर सवलतीचा लाभही मिळतो. कलम ८० सी अंतर्गत, एका वर्षात कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
टॅग्स :गुंतवणूकसरकार