Join us

२००० रुपयांनी स्वस्त झालं Gold; यावेळी सोनं खरेदी करणं आहे का फायद्याचं, काय म्हणाले एक्सपर्ट?

By जयदीप दाभोळकर | Updated: March 22, 2025 15:07 IST

गेल्या काही काळापासून सोन्याचांदीच्या दरात तेजी दिसून येत होती. परंतु दोन-तीन दिवसांपासून त्यात घसरण झाली आहे.

सोन्याच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्स गोल्डनं नुकताच प्रति १० ग्रॅम ८९,७९६ रुपयांचा स्तर गाठला. पण तेव्हापासून तो प्रॉफिट बुकिंगचा बळी ठरला आहे. ज्यामुळे किमती तब्बल २००० रुपयांनी घसरल्या. त्यानंतर एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८७,७८५ रुपयांवर आला. या एमसीएक्स सोन्याच्या किंमतीत १४ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात यंदा सोन्याच्या दरात १५ टक्क्यांची वाढ झाली होती.

किंमतीत तेजी येणार का?

तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर वाढण्यामागचं कारण परताव्याची हमी आहे. त्याचबरोबर गाझामधील वाढता तणाव आणि अमेरिकेत मंदीची शक्यता यामुळे सोन्याचे दर वाढण्यास मदत झाली आहे. अमेरिकन फेडच्या बैठकीमुळेही किमती वाढण्यास मदत झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे म्हणण्यानुसार, आर्थिक विकास मंदावेल आणि महागाई वाढेल. ज्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसणार आहे. सोन्याच्या दरात घसरण होत असताना त्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

काय म्हणाले एक्सपर्टं?

"सोन्याचे दर वाढण्यामागे सुरक्षित गुंतवणूक तसेच गाझामधील वाढलेला तणाव हे कारण आहे. याशिवाय अमेरिकेतील मंदीची चिंता आणि शुल्कामुळे महागाई वाढण्याची शक्यता यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. याशिवाय डॉलर निर्देशांकातील घसरणीमुळे सोन्याची चमकही वाढली आहे,” अशी प्रतिक्रिया एसएस वेल्थ स्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा यांनी दिली.

सोन्यावर अजूनही दबाव राहील, असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामागचं कारण म्हणजे रुपया मजबूत असल्याचं त्यांनी सांगितलं. रुपया मजबूत झाल्यास सोन्याच्या दरात घसरण होऊ शकते. सोन्याच्या किमतीसाठी ८८ हजार रुपयांची पातळी अत्यंत महत्त्वाची ठरतं, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

 

टॅग्स :सोनंचांदी