Join us
Daily Top 2Weekly Top 5

अदानींच्या एका कंपनीला 1190 कोटींचा तोटा, तर दुसऱ्या कंपनीला 16,584 कोटींचा नफा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 19:49 IST

गौतम अदानी सातत्याने आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहेत.

Gautam Adani : देशासह आशियातील दोन नंबरचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) सातत्याने आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहेत. देशातील पोर्ट आणि विमानतळ व्यवस्थापनासह ऊर्जा क्षेत्रातही त्यांचा दबदबा आहे. पण, अशातच त्यांच्या एका ऊर्जा कंपनीला 1190 कोटी रुपयांहून अधिक नुकसान सहन करावे लागले. विशेष म्हणजे, हे नुकसान त्यांच्याच दुसऱ्या एका कंपनीने भरुन काढले अन् अवघ्या 6 तासांत अदानींना 16,584 कोटी रुपये कमावून दिले.

अदानी समूहाचे नाव जगातील टॉपच्या ग्रीन एनर्जी कंपन्यांमध्ये आहे. अदानी ग्रीननेही अलीकडेच आपल्या नफ्याचे तपशील शेअर केले. समूहातील अदानी एनर्जी सोल्युशन्सदेखील देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. एप्रिल ते जून तिमाहीत या कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला आहे.

अदानी एनर्जी सोल्युशन्सची स्थितीचालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडला 1,190.66 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. कंपनीच्या खर्चात झालेली प्रचंड वाढ, हे त्याचे प्रमुख कारण आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2023-24 च्या याच तिमाहीत (एप्रिल-जून) कंपनीने 181.98 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत तिचे एकूण उत्पन्न 5,489.97 कोटी रुपये झाले आहे. तर गेल्या आर्थिक वर्ष 2023- मध्ये कंपनीचे उत्पन्न 3,772.25 कोटी रुपये होते. तर या कालावधीत कंपनीचा खर्च 3,124.69 कोटी रुपयांवरून 4,443 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

अदानी ग्रीन एनर्जीची स्थितीगुरुवारी अदानी ग्रुपची आणखी एक कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने मोठी झेप घेतली. कंपनीच्या शेअरची किंमत 8 टक्क्यांनी वाढली. याचे कारण म्हणजे, एप्रिल-जून तिमाहीत कंपनीने 629 कोटी रुपयांचा नफा बुक केला. 2023-24 च्या याच तिमाहीत 323 कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा हे 95 टक्के अधिक आहे. शेअर बाजारात कंपनीच्या शेअरचा भाव दिवसभरात 7.80 टक्क्यांनी वाढून 1,850 रुपयांवर पोहोचला. तर संध्याकाळपर्यंत तो 6.10 टक्क्यांच्या वाढीसह 1,820.70 रुपयांवर बंद झाला. NSE वर देखील कंपनीचे शेअर्स 7.75 टक्क्यांनी वाढून 1,849 रुपये झाले. यामुळे कंपनीचे बाजार भांडवल (MCap) 16,584.82 कोटी रुपयांनी वाढून 2,88,404.79 कोटी रुपये झाले.

टॅग्स :गौतम अदानीव्यवसायगुंतवणूक