Join us

बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करायचंय, मग ५५५ दिवसांची 'ही' लाभदायक योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 08:50 IST

इंडियन बँकेने या पॉलिसीसह नवीन ५५५ दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिटची योजना सुरू केली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न महाग झाले आहे. तसेच, ज्यांनी यापूर्वीच घरासाठी कर्ज घेतले, त्यांनाही व्याजदरात आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांनी फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात वाढ केली असून इतरही नवीन योजना ठेवीदारांसाठी सुरू केल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेतील फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. विशेष म्हणजे १९ डिसेंबरपासून हे नवीन दर लागूही झाले आहेत. 

इंडियन बँकेने या पॉलिसीसह नवीन ५५५ दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिटची योजना सुरू केली आहे. या ५५५ दिवसांच्या कायम ठेवीवर खातेदारांना ७ टक्के व्याज देण्यात येणार आहे. त्यात, ज्येष्ठ नागरिकांना ७.१५ टक्के व्याजदर ठेवण्यात आलं आहे. ५ हजार रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करता येऊ शकते. बँकेकडून अगदी १ महिन्यांपासून ते ५५५ दिवसांपर्यंतच्या फिक्स डिपॉझिटवर व्याज देण्यात येत आहे. त्यानुसार, ७ ते २९ दिवसांपर्यंत मॅच्युअर होणाऱ्या कायम ठेवीवर २.८० टक्के, ३० ते ४५ दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ३ टक्के तर ४५ ते ९० दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर ३.२५ टक्के व्याजदर इंडियन बँकेकडून देण्यात येत आहे. ९१ ते १२० दिवसांच्या कायम ठेवीवर ३.५ टक्के, १२१ ते १८० दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर ३.८५ टक्के तसेच १८० दिवस आणि ९ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या ठेवी योजनांवर ४.५० टक्के व्याजदर मिळत आहे. 

दरम्यान, नव्याने सुरु केलेल्या ५५५ दिवसांच्या कायम ठेवीवर ७ टक्के व्याजदर देण्यात येत असून ग्राहकांना ही योजना इतर योजनांच्या तुलनेत फायदेशीर ठरणार आहे. 

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्रभारतीय रिझर्व्ह बँक