Join us
Daily Top 2Weekly Top 5

संकट आलेय दारावर! 'बॅलन्स शीट' भक्कम करण्याची वेळ; कुटुंब कसे वाचवाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 17:04 IST

इमर्जन्सी फंड, विमा असल्यास संकट तुमच्याजवळ येणारही नाही; नवीन कर्ज आणि चैनीचा खर्च टाळा

आज भारतीय कुटुंबाचे उत्पन्न वाढले आहे तर कर्ज मिळणेही अतिशय सोपे झाले आहे. पण या झगमगाटाच्या मागे एक धोक्याची घंटाही वाजत आहे. वाढते ईएमआय, बदलती जीवनशैली आणि बचतीचा अभाव यांमुळे उत्पन्नाचा मोठा वाटा हातात येण्यापूर्वीच खर्च झालेला असतो.

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या प्रचंड घडामोडी व आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आहे. जर उद्या नोकरीवर गदा आली, व्यवसायात मंदी, देशावर मोठे आर्थिक संकट आले तर तुमचे कुटुंब या संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहे?

उत्पन्न जास्त म्हणजे आर्थिक स्थैर्य नव्हे!

आज कुटुंबांचे बजेट पगारापेक्षा जास्त ईएमआयच्या तारखांवर अवलंबून असते. समस्या उत्पन्नाच्या वेगाने वाढणाऱ्या कर्जाची आणि खर्चाची आहे. आज 'बाय नाऊ पे लेटर' आणि सुलभ हप्त्यांमुळे चैनीच्या वस्तू खरेदी करणे सोपे झाले असले तरी, यामुळे भविष्यातील उत्पन्नावरचा ताण वाढत चालला आहे. अनेकांच्या मासिक बजेटमध्ये पगार येण्यापूर्वीच मोठा हिस्सा ईएमआयमध्ये जातो आहे.

तुमची 'बॅलन्स शीट' तपासा
 

कठीण काळात लोकांनी  'बॅलन्स शीट'वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. याचा अर्थ असा की, तुमच्याकडे येणारा पैसा आणि जाणारा पैसा यांपेक्षा तुमच्याकडे प्रत्यक्षात शिल्लक किती मालमत्ता किंवा रोख रक्कम आहे, हे महत्त्वाचे आहे.

निष्कर्ष काय : आर्थिक नियोजनाचा अर्थ असा नाही की तुम्ही खर्च करणे थांबवावे किंवा आनंदावर विरजण घालावे. याचा अर्थ केवळ इतकाच आहे की, अनिश्चिततेच्या काळात तुमच्याकडे पुरेशी लवचिकता आणि बचत असावी, जेणेकरून संकटाच्या वेळी तुम्हाला पुन्हा कर्जाच्या खाईत उडी मारावी लागणार नाही. पुन्हा एकदा खर्चावर नियंत्रण ठेवा आणि आपली आर्थिक सुरक्षा अधिक भक्कम करा. पगार किती आहे, यापेक्षा संकटाच्या वेळी तुमच्याकडे किती महिने टिकून राहण्याची ताकद आहे, हेच आता खरे आर्थिक सामर्थ्य ठरणार आहे.

आर्थिक सुरक्षिततेसाठी ही पाच पावले उचला

इमर्जन्सी फंड तयार करा : तुमच्याकडे किमान तीन ते सहा महिन्यांच्या खर्चासाठी पुरेल इतकी रोख रक्कम बचत खात्यात असणे आवश्यक आहे. यामुळे नोकरी गेली तरीही लगेच फटका बसत नाही.

नवीन ईएमआय टाळा : जर तुमच्या नोकरीची किंवा उत्पन्नाची खात्री नसेल, तर नवीन कर्ज किंवा ईएमआयवर वस्तू घेणे टाळा. यामुळे खिशातील सर्व रक्कम संपले आणि आर्थिक संकट येईल.

महागड्या कर्जांचा आढावा घ्या : क्रेडिट कार्ड किंवा वैयक्तिक कर्जावरील जास्त व्याज कमी करण्यासाठी स्वस्त व्याजदराचे कर्ज घ्या. जर संकट येण्याची चाहूल असेल तर काही दिवस कर्ज घेऊ नका.

स्मार्ट रिफायनान्सिंग : कर्ज बदलताना मासिक हप्ता वाढू देऊ नका; अन्यथा घरखर्च, बचत व नियोजन बिघडू शकते. त्यामुळे उत्पन्नाचा ताळमेळ राखत हप्ता शक्य असल्यास कमी ठेवा.

छोट्या खर्चावर लगाम : मोबाइल सबस्क्रिप्शन, वारंवार होणारी ऑनलाइन खरेदी आणि ॲप-आधारित छोटे खर्च एकत्र मिळून मोठे भगदाड पाडतात. या 'छोट्या गळती' रोखणे गरजेचे आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Economic crisis looms: Strengthen balance sheet, protect your family now!

Web Summary : Rising EMIs and lifestyle changes threaten family finances. Review your balance sheet, build an emergency fund, avoid new EMIs, and control small expenses for financial security during uncertain times.
टॅग्स :गुंतवणूकबँकिंग क्षेत्रमहागाई