Join us

'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 09:01 IST

Canara Bank Savings Scheme: आज आम्ही तुम्हाला कॅनरा बँकेच्या एका एफडी स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये फक्त १ लाख रुपये जमा करून १४,८८८ रुपयांचे फिक्स्ड व्याज मिळू शकतं.

Canara Bank Savings Scheme: आरबीआयने रेपो दरात कपात केल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेनंही एफडी योजनेच्या व्याजदरात कपात केली आहे. मात्र, कॅनरा बँकेत अजूनही एफडी म्हणजेच मुदत ठेवींवर आकर्षक व्याज मिळत आहे. कॅनरा बँकेत ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खाते उघडता येतं. ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर ३.५० टक्क्यांपासून ७.२० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. आज आम्ही तुम्हाला कॅनरा बँकेच्या एका एफडी स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये फक्त १ लाख रुपये जमा करून १४,८८८ रुपयांचे फिक्स्ड व्याज मिळू शकतं.

४४४ दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज

एफडी खात्यांवर ग्राहकांना ठराविक कालावधीनंतर संपूर्ण मुद्दल निश्चित व्याजासह परत मिळते. सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँक आपल्या ग्राहकांना ४४४ दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज दर देत आहे. बँक सर्वसामान्यांना ४४४ दिवसांच्या एफडीवर ६.६० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.१० टक्के आणि अतिज्येष्ठ नागरिकांना (८० वर्षांवरील) ७.२० टक्के व्याज देते. कॅनरा बँक २ वर्षांच्या एफडीवर सर्वसामान्यांना ६.५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.०० टक्के व्याज देत आहे.

१४,८८८ रुपयांचं निश्चित व्याज

जर तुम्ही सामान्य नागरिक असाल म्हणजेच तुमचं वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल आणि कॅनरा बँकेत २ वर्षांच्या एफडी योजनेत १,००,००० रुपये जमा केले असतील तर तुम्हाला १३,७६४ रुपयांच्या फिक्स्ड इंटरेस्टसह मॅच्युरिटीवर एकूण १,१३,७६४ रुपये मिळतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजेच ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल आणि तुम्ही कॅनरा बँकेत १,००,००० रुपये जमा केले असतील तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,१४,८८८ रुपये मिळतील, ज्यात १४,८८८ रुपयांच्या फिक्स्ड इंटरेस्टचा समावेश आहे. कॅनरा बँक ही सरकारी बँक असून त्यावर केंद्र सरकारचं नियंत्रण आहे, त्यामुळे त्यात तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या.)

टॅग्स :बँकगुंतवणूक