Join us

अमृत कलश, उत्सव, अमृत वृष्टी... यापैकी कोणत्या स्पेशल FD मध्ये सर्वाधिक व्याज, कुठे गुंतवू शकता पैसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 09:06 IST

Fixed Deposit Schemes : भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. अनेक जण उत्तम परताव्यासह सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय स्वीकारत असतात. त्यामुळे आजही अनेकांची एफडीला पसंती आहे.

Fixed Deposit Schemes : भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. अनेक जण उत्तम परताव्यासह सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय स्वीकारत असतात. त्यामुळे आजही अनेकांची एफडीला पसंती आहे. परंतु गेल्या काही काळात शेअर बाजारातील गुंतवणूकीचा ओघही वाढलाय. परंतु गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक भारतीय बँकांनी उच्च व्याजदरासह विशेष एफडी योजना सुरू केल्यात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), इंडियन बँक, आयडीबीआय बँक आणि पंजाब अँड सिंध बँक या बँकांमध्ये याचा लाभ घेता येईल. स्थिर परताव्याच्या शोधात असलेल्यांसाठी या योजना चांगली संधी आहेत. त्यामध्ये गुंतवणुकीसाठी ठराविक कालमर्यादा असते. या योजनांविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

एफडी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणुकीचा सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्ग मानला जातो. परंतु, म्युच्युअल फंड आणि शेअर बाजाराच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे एफडीमधील गुंतवणूक कमी झालीये. ही तूट भरून काढण्यासाठी बँकांनी तात्पुरत्या स्वरूपात विशेष एफडी योजना सुरू केल्यात. या योजनांमध्ये ग्राहकांना अधिक व्याज मिळतं.

अमृत कलश आणि अमृत सृष्टी

एसबीआयनं 'अमृत कलश' आणि 'अमृत सृष्टी' या दोन नवीन स्कीम्स सुरू केल्या आहेत. ४०० दिवसांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी ७.१० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६ टक्के व्याजदर आहे. ४४४ दिवसांसाठी सर्वसामान्य नागरिकांना ७.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याजदर दिला जात आहे. या दोन्ही स्कीम्समध्ये अतिज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ०.१० टक्के व्याज मिळणारे. या योजनांमध्ये ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करता येईल.

उत्सव कोलेबल एफडी

आयडीबीआय बँकेच्या 'उत्सव कॉलेबल एफडी' योजनेत वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर आहेत. ५५५ दिवसांसाठीच्या एफडीसाठी सर्वसामान्यांना व्याजदर ७.४० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.९० टक्के व्याज दिलं जात आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे.

या योजनाही फायदेशीर आहेत

इंडियन बँकेनं आपल्या 'आयएनडी सुप्रीम ३०० डेज' आणि 'आयएनडी सुपर ४०० डेज' योजनांना ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आयएनडी सुपर ४०० डेज योजनेत सर्वसामान्यांसाठी ७.३० टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.८० टक्के आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी ८.०५ टक्के व्याज दिलं जात आहे. 'आयएनडी सुप्रीम ३०० डेज' योजनेवर ७.०५ टक्के व्याज दर आहे.

पंजाब अँड सिंध बँकेची स्पेशल एफडी

पंजाब अँड सिंध बँक देखील विविध मुदतीच्या विशेष एफडी योजना ऑफर करते. यामध्ये २२२, ३३३, ४४४, ५५५ (कॉलेबल), ५५५ (नॉन-कॉलेबल), ७७७, ९९९ (कॉलेबल) आणि ९९९ (नॉन-कॉलेबल) दिवसांचा कालावधी आहे. या योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत वैध आहेत.

टॅग्स :गुंतवणूकबँक