Join us

गेल्यावर्षी झालेला फसवणुकीचा आरोप; आता अदानी समूह अमेरिकेत करणार मोठी गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 20:59 IST

Gautam Adani: गौतम अदानींसह आठ जणांवर फसवणूक आणि लाच दिल्याचा आरोप झाला होता.

Gautam Adani: दिग्गज भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह पुन्हा एकदा अमेरिकेत मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. फायनान्शिअल टाईम्सच्या अहवालानुसार, अदानी समूह न्यूक्लियर एनर्जी, यूटिलिटी आणि पूर्व किनाऱ्यावर असलेले बंदर...यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये पुन्हा गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच अमेरिकेत गौतम अदानी यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. अदानींसह 8 जणांवर 2200 कोटींहून अधिक रुपयांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला होता. आता ट्रम्प यांनी फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्ट 1977 वर बंदी घातल्याने अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला असून, ते पुन्हा अमेरिकेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर अदानी यांनी वचन दिले होते की, ते अमेरिकेत 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करतील, ज्याद्वारे 15,000 नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर लगेचच अदानींसह आठ जणांवर गुंतवणूकदारांची फसवणूक आणि लाच दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. यामुळे गुंतवणुकीची चर्चा पुढे सरकू शकली नाही. 24 ऑक्टोबर 2024 रोजी न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता फायनान्शिअल टाईम्सच्या अहवालानुसार, ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर गुंतवणूकीची योजना पुढे सरकत आहे. 

अदानी समूहावर काय आरोप होते?गौतम अदानी यांच्यासह त्यांचा पुतण्या सागर अदानी, विनीत एस जैन, रणजित गुप्ता, सिरिल कॅबनिस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा ​​आणि रूपेश अग्रवाल यांच्यावर अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. युनायटेड स्टेट्स ॲटर्नी कार्यालयानुसार, गौतम अदानी यांनी भारतात सौरऊर्जेशी संबंधित कंत्राटे मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना $265 दशलक्ष (सुमारे 2200 कोटी रुपये) लाच दिली किंवा देण्याची योजना आखली होती.

लाचेचे पैसे गोळा करण्यासाठी अमेरिकन गुंतवणूकदारांना, तसेच बँकांशी खोटे बोलले. हे प्रकरण अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि इतर कंपन्यांशी संबंधित आहे. अमेरिकन गुंतवणुकदारांच्या पैशाने लाच देणे, हा गुन्हा आहे, असे अमेरिकन कायदा सांगतो, त्यामुळे अमेरिकेत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अदानी समूहाने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले होते. 

टॅग्स :गौतम अदानीअमेरिकागुंतवणूकडोनाल्ड ट्रम्प