भारताच्या सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या दिशेने उद्योगपती गौतम अदानी यांनी मोठे पाऊल उचलले आहे. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने (Adani Defence & Aerospace) 18 मे रोजी अमेरिकन कंपनी स्पार्टनसोबत (Sparton) धोरणात्मक भागीदारी केली आहे. एल्बिट सिस्टम्सची समूह कंपनी स्पार्टन आता अदानींना भारतात अँटी-सबमरीन वॉरफेअर (ASW) प्रणाली असेंबल करण्यास मदत करेल.
आता Sonobuoy सारख्या हाय-टेक सिस्टीम भारतातच बनवल्या जाणार
या भागीदारीअंतर्गत Sonobuoy आणि इतर पाणबुडीविरोधी युद्ध प्रणाली भारतात तयार केल्या जातील. 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' मोहिमांतर्गत हा उपक्रम हाती घेतला जात आहे. भारतातील ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एखादी खाजगी कंपनी नौदलाला स्वदेशी बनावटीचे Sonobuoy सोल्यूशन्स पुरवणार आहे.
Sonobuoy म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे?Sonobuoy हे एक अत्याधुनिक उपकरण आहे, जे समुद्राखालील शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यास आणि त्यांचा मागोवा घेण्यास मदत करते. यामुळे भारतीय नौदलाच्या 'अंडरसी डोमेन अवेअरनेस' क्षमता वाढतात. नौदल सुरक्षा, गस्त आणि वाहक स्ट्राइक ग्रुप्सच्या संरक्षणासाठी ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे. आतापर्यंत भारताला हे तंत्रज्ञान परदेशातून आयात करावे लागत होते, पण आता अदानी डिफेन्स हे तंत्रज्ञान देशातच विकसित करेल.
'मेक इन इंडिया' उपक्रमस्पार्टन आधीपासून भारतीय नौदलासोबत काम करत आहे, आता या नवीन भागीदारीअंतर्गत, अदानी डिफेन्स हे पूर्णपणे 'मेड इन इंडिया' स्वरूपात पुरवेल. या उपक्रमामुळे देशाच्या संरक्षण तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन मिळेल.
या प्रसंगी बोलताना, अदानी एंटरप्रायझेसचे उपाध्यक्ष जीत अदानी म्हणाले, "आजच्या अस्थिर सागरी वातावरणात, भारताचे पाण्याखालील युद्ध क्षमता बळकट करणे, हे केवळ एक धोरणात्मक प्राधान्य नाही, तर राष्ट्राच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे. भारतीय नौदलाला मिशनसाठी तयार आणि स्वदेशी विकसित प्रणालींची आवश्यकता आहे, ज्या जागतिक स्तरावर स्पर्धात्मक असतील. स्पार्टनसोबतच्या या भागीदारीद्वारे, अदानी डिफेन्स आता देशाला तेच समाधान प्रदान करेल."