Join us

Zepto चे सीईओ आदित पालिचांनी स्पर्धक कंपनीच्या CFO वर केला मोठा आरोप; म्हणाले, "आमच्या गुंतवणूकदारांना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 13:07 IST

Zepto News: क्विक डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झेप्टोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक आदित पालिचा यांनी आपल्या स्पर्धक कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्यावर कंपनीची बदनामी केल्याचा आरोप केला आहे.

Zepto News: क्विक डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झेप्टोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक आदित पालिचा यांनी आपल्या स्पर्धक कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्यावर कंपनीची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. स्पर्धक कंपनीचे सीएफओ गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याविरोधात नकारात्मक प्रचार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. लिंक्डइन पोस्टच्या माध्यमातून आदित पालिचा यांनी ही माहिती सर्वांसोबत शेअर केली आहे.

काय म्हणाले आदित पालिचा?

"आमच्या गुंतवणूकदारांना फोन करून तथ्य नसलेले आरोप केले जात आहेत. पत्रकारांना चुकीच्या नंबरसह एक्सेल शीट शेअर करणं, त्याचबरोबर सोशल मीडियावरील नकारात्मक बातम्यांसाठी बॉट्सना पैसे दिले जात आहेत," असं आदित पालिचा यांनी आपल्या लिंक्डिन पोस्टमध्ये म्हटलंय. आदित यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणत्याही कंपनीचं नाव घेतलेलं नाही. या क्षेत्रात झेप्टोव्यतिरिक्त ब्लिंकिट, स्विगी इन्स्टामार्ट, फ्लिपकार्ट मिनिट्स आणि टाटा बिगबास्केट सारख्या कंपन्या आहेत. आदित पालिचा पुढे लिहितात की, हे काम मोठ्या कंपनीच्या सीएफओला शोभत नाही. त्याचवेळी, झेप्टोच्या EBITDA मध्ये झपाट्यानं होत असलेल्या सुधारणांबद्दल त्यांच्यात भीती असल्याचंही त्यांनी सांगितलं.

₹१४,४५,००,४४,०८,१०० च्या मार्केटवर नजर! गौतम अदानींच्या झोळीत येणार आणखी एक कंपनी

कंपनीबद्दल काय म्हणाले?

मे २०२५ मध्ये झेप्टोचे ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू ७५० कोटी रुपयांवरून २४०० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. जानेवारी २०२५ च्या तुलनेत मे २०२५ मध्ये कंपनीच्या एबिटडामध्ये २००० बेसिस पॉईंट्सची वाढ झाली आहे. याच कालावधीत कंपनीच्या कॅश बर्नमध्येही ६५ टक्क्यांनी घट झाली असल्याचं आदित पालिचा म्हणाले. पुढील तिमाहीपर्यंत जवळजवळ सर्व डार्क स्टोअर्सचे एबिटडा सकारात्मक राहतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

तिमाहीच्या सुरुवातीला कंपनीकडे बँकेत ७,४४५ कोटी रुपयांची रोकड होती. सध्याचा खर्च पाहिला तर कंपनीकडे अनेक वर्षांपर्यंतचा पैसा आहे. मी योग्य आणि आक्रमक चर्चेसाठीही पूर्णपणे तयार आहे. पण कोणत्याही प्रकारचा खोटेपणा मान्य करता येणार नाही, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय.

टॅग्स :व्यवसाय