Join us  

'या' ठिकाणी मिळेल मुदत ठेवींवर अधिक व्याज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 10:00 AM

परताव्याबरोबर जेव्हा गुंतवणुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो, तेव्हा लोक सरकारी बँकांच्या मुदत ठेवींना प्राधान्य देतात. सर्वाेच्च परतावा देणाऱ्या ५ सरकारी बँकांची माहिती आपण येथे घेऊ या.

नवी दिल्ली : मुदत ठेवी या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणारा गुंतवणूक पर्याय आहे. कारण, व्याजात होणाऱ्या बदलांचा ठेवींवर कोणताही परिणाम होत नाही. परताव्याबरोबर जेव्हा गुंतवणुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो, तेव्हा लोक सरकारी बँकांच्या मुदत ठेवींना प्राधान्य देतात. सर्वाेच्च परतावा देणाऱ्या ५ सरकारी बँकांची माहिती आपण येथे घेऊ या.

युनियन बँक ऑफ इंडिया१ सप्टेंबर २०२१ पासून युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या व्याजदरांत सुधारणा केली आहे. त्यानुसार, सामान्य गुंतवणूकदारांना ३ टक्के ते ५.४० टक्के व्याजदर बँक देते. ज्येष्ठ नागरिकांना ३.५० टक्के ते ६.०० टक्के व्याजदर मिळतो. हे व्याजदर २ कोटींपर्यंतच्या ठेवींवर आहेत. ७ ते १४ दिवसांसाठी ३ ते ३.५० टक्के तर  ५ वर्षांवरील ठेवींवर ५.५० टक्के ते ६.०० टक्के व्याज दर बँक देते.

पंजाब नॅशनल बँकपंजाब नॅशनल बँकेने १ ऑगस्टपासून २ कोटींपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदरांत सुधारणा केली आहे. ७ ते १४ दिवसांपर्यंतच्या ठेवींवर सामान्य गुंतवणूकदारांसाठी २.९ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.४ टक्के व्याजदर बँकेने ठेवला आहे. ३ वर्षांपासून पुढच्या ठेवींवर सामान्यांसाठी ५.२५ टक्के, तर ज्येष्ठांसाठी ५.७५ टक्के व्याजदर आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियादेशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या एसबीआयचे सध्याचे व्याजदर ८ जानेवारी २०२१ पासून लागू आहेत. २ कोटींपर्यंतच्या ठेवींवर सामान्यांसाठी २.९० टक्के ते ५.४० टक्के, तर ज्येष्ठांसाठी ३.४० टक्के ते  ६.२० टक्के व्याजदर आहे.

जम्मू - काश्मीर बँकजम्मू - काश्मीर बँकेचे सध्याचे व्याजदर ११ ऑक्टोबर २०२० पासून अस्तित्वात आहेत. सामान्यांसाठी ३.०० टक्के ते ५.३० टक्के व ज्येष्ठांसाठी ३.५० टक्के ते ५.८० टक्के व्याजदर बँक देते. 

पंजाब ॲण्ड सिंध बँक  पंजाब ॲण्ड सिंध बँकेने १६ सप्टेंबरपासून सुधारित व्याजदर लागू केले. सामान्यांसाठी ३ टक्के ते ५.३ टक्के तसेच ज्येष्ठांसाठी ३.५ टक्के ते ५.८ टक्के व्याजदर बँक देते. 

टॅग्स :बँकगुंतवणूकपैसा