Join us  

स्वस्त फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी मिळणार; मुकेश अंबानी 'या' क्षेत्रात खळबळ माजवणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:02 PM

Reliance: मुकेश अंबानी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्स क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत.

Reliance New Plan: दिग्गज भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांनी ऊर्जेपासून ते फॅशनपर्यंत अन् इंटरनेटपासून ते ग्रॉसरीपर्यंत...विविध क्षेत्रात 1985000 कोटी रुपयांचा व्यवसाय उभारला आहे. पण, आता अंबानी आणखी एका क्षेत्रात खळबळ माजवण्याच्या तयारीत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्स व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. 

गेल्या वर्षीच रिलायन्स कंझ्युमरने मेड फॉर इंडिया कंझ्युमर गुड्स ब्रँड 'इंडिपेंडन्स' लॉन्च केला होता. या ब्रँड अंतर्गत रिलायन्सने पीठ, तांदूळ, डाळीसारखे स्वस्त खाद्यपदार्थ बाजारात आणले. आता कंपनी स्वस्त एसी, फ्रीज, टीव्ही यांसारख्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्स व्यवसायात उतरण्याची तयारी करत आहे. या सेगमेंटमधील परदेशी कंपन्यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी रिलायन्सने योजना आखली आहे. सध्या या सेगमेंटमध्ये LG, Samsung, Whirlpool, Haier, Daikin सारख्या ब्रँड्स आहेत. 

काय तयारी केली?रिलायन्स Wyzr ब्रँड अंतर्गत मेड-इन-इंडिया उत्पादने लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या अंतर्गत एसी, टीव्ही, फ्रीज, एलईडी बल्ब, वॉशिंग मशीन यांसारखी उत्पादने लॉन्च केली जातील. दरम्यान, भारतात घरगुती उपकरणांची बाजारपेठ 1.1 लाख कोटी रुपयांची आहे, ज्यामध्ये एलजी, सॅमसंग, व्हर्लपूल, हायर इत्यादी परदेशी कंपन्यांचा 60% हिस्सा आहे. तर एसी मार्केटमध्ये टाटाच्या व्होल्टासचे वर्चस्व आहे.

अलीकडेच रिलायन्स रिटेलने Wyzr ब्रँडचे एअर कूलर लाँच केले. आता कंपनी होम अप्लायन्स क्षेत्रात आपला दबदबा वाढवण्यासाठी डिक्सन टेक्नॉलॉजीज आणि मिर्क इलेक्ट्रॉनिक्स, या कंपन्यांशी बोलणी करत आहे. विशेष म्हणजे, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील प्रवेशासाठी रिलायन्सने 2022 साली अमेरिकन कंपनी सनमीनाच्या भारतीय युनिटमधील 50.1% हिस्सा 1670 कोटी रुपयांना खरेदी केला होता. या कंपनीचा भारतातील चेन्नई येथे 100 एकरचा प्लांट आहे. रिलायन्सची Wyzr उत्पादने येथे तयार केली जाऊ शकतात असे मानले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

स्वस्त उत्पादनांवर रिलायन्सचा भररिलायन्सचे मोठे रिटेल नेटवर्क आहे, त्यामुळे ही ही उपकरणे रिलायन्स स्टोअर्स आणि स्वतंत्र डीलर्स, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ई-कॉमर्स साइट्स सारख्या चेनद्वारे विकली जाऊ शकतात. रिलायन्सकडे Jio Mart, Reliance Store सारखे पर्यायदेखील आहेत. रिलायन्स Wyzr ची उत्पादने एलजी, सॅमसंग आणि व्हर्लपूल सारख्या ब्रँडच्या तुलनेत स्वस्त असू शकतात. 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सव्यवसायगुंतवणूक