नवी दिल्ली : सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे कामगार कामासाठी आपल्या गावातून स्थलांतर करण्यास तयार नाहीत, असे वक्तव्य लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) चे चेअरमन एस. एन. सब्रमण्यन यांनी केले आहे. सुब्रमण्यन यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याआधी कर्मचाऱ्यांनी आठवड्यात ९० तास काम करायला हवे, असे वक्तव्य करून त्यांनी वाद ओढवून घेतला होता.
मंगळवारी ‘सीआयआय’ने चेन्नई येथे आयोजित केलेल्या ‘मिस्टिक साऊथ ग्लोबल लिंकेज समिट २०२५’ या कार्यक्रमात सुब्रमण्यन म्हणाले की, बांधकाम उद्योगासाठी कामगार मिळणे कठीण झाले आहे. लोक आरामास प्राधान्य देतात. त्यामुळे कामासाठी गाव सोडायला तयार नाहीत. मनरेगा, थेट लाभ हस्तांतरण आणि जनधन खाती यांसारख्या योजनांमुळे कामगार मिळविणे अवघड होऊ लागले आहे.
गरज ४ लाख कामगारांची, भरती ६ लाख जणांचीसुब्रमण्यन म्हणाले की, भारतात स्थलांतराची मोठी समस्या आहे. लोक वारंवार काम सोडून निघून जातात. एल अँड टीला ४ लाख कामगारांची गरज असते. मात्र, लोक वारंवार काम सोडून जात असल्याने ६ लाख कामगारांची भरती करावी लागते. कामगार उपलब्धतेअभावी भारताच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीवर परिणाम होऊ शकतो. - एस. एन. सब्रमण्यन, चेअरमन, लार्सन अँड टुब्रो
महागाईनुसार कामगारांचे वेतन वाढवावे लागेल सुब्रमण्यन म्हणाले की, कामगार नव्या संधीच्या शोधार्थ बाहेर पडण्यास तयार नाहीत. स्थानिक कमाईत त्यांचे उत्तम चालले असावे, अथवा सरकारी योजनांमुळे गावातून शहरात जाण्याची गरज राहिलेली नसावी. त्यामुळे कामगारांच्या वेतनात महागाईनुसार वाढ करण्याची गरज आहे. कारण पश्चिम आशियात कामगारांना भारतापेक्षा तीन ते साडेतीनपट अधिक वेतन मिळते. त्यामुळे कामगार तिकडे जातात.
कामासाठी दिल्लीला जा सांगताच, तो म्हणेल 'बाय'एल अँड टीचे चेअरमन एस. एन. सुब्रह्मण्यम यांनी एक आठवणही सांगितली. ते म्हणाले की, जेव्हा मी १९८३ मध्ये एल अँड टीमध्ये रुजू झालो, तेव्हा माझ्या बॉसने सांगितले की, जरी तुम्ही चेन्नईचे असाल, तर तुम्हाला दिल्लीत जाऊन काम करावे लागेल. आज जर मी चेन्नईतील एखाद्या व्यक्तीला दिल्लीत जाऊन काम करायला सांगितले, तर तो मला सरळ 'बाय' म्हणून निघून जाईल.
दोन वर्षांचे वेटिंग, ६ महिन्यांत हकालपट्टीइन्फोसिसने ७०० नवपदवीधारकांना तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कामावर रुजू करून घेतले खरे, मात्र नंतर सहाच महिन्यात त्यांना कर्मचारी कपातीच्या नावाखाली कामावरून काढून टाकले, असा आरोप आयटी कर्मचाऱ्यांची संघटना ‘नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेट’ने (नाईटेस) केला आहे. इन्फोसिसने म्हटले की, म्हैसूर कॅम्पसमध्ये प्रशिक्षणानंतर नवपदवीधारकांना एक अंतर्गत चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक होते. त्यांना ३ संधी दिल्या. जे उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, त्यांना घरी पाठवले आहे. करारातच ही बाब नमूद आहे.