Join us

७० तास काम करावे, जगाशी स्पर्धा करण्यासाठी वर्क कल्चर बदलावे लागेल; नारायण मूर्तींनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 20:02 IST

इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी २०२० मध्ये कंपन्यांच्या सीईओंना दोन-तीन वर्षे काही अतिरिक्त तास काम करण्याचा सल्ला दिला होता . आता त्यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला आहे.

गेल्या दोन-तीन दशकांत आर्थिक आघाडीवर चांगली कामगिरी करणाऱ्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी भारताला आपली कार्यसंस्कृती बदलावी लागेल. यासाठी तरुणांनी कामात जास्त वेळ घालवला पाहिजे, असा सल्ला इन्फोसिसचे सहसंस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी दिला आहे. त्यांच्या मते भारताची काम उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. हे वाढवण्यासाठी देशातील तरुणांनी दर आठवड्याला ७० तास काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. 

एका पॉडकास्टमध्ये बोलताना मूर्ती यांनी हा सल्ला दिला. नारायण मूर्ती यांनी राष्ट्र उभारणीपासून तंत्रज्ञान, आजची तरुणाई आणि त्यांची कंपनी इन्फोसिस अशा अनेक विषयांवर आपली मते मांडली.  नारायण मूर्ती म्हणाले, दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनीने हे काम करून विकासाच्या शिखरांना स्पर्श केला आहे. 

नारायण मूर्ती यांनी भारताच्या कमी कामाच्या उत्पादकतेची कारणेही सांगितली. मूर्ती म्हणाले की, सरकारमधील भ्रष्टाचार आणि नोकरशाहीतील दिरंगाई ही कामाची उत्पादकता कमी होण्याची प्रमुख कारणे आहेत. “भारताची काम उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. जोपर्यंत आपण सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार कमी करत नाही आणि नोकरशाहीतील दिरंगाईला आळा घालत नाही, तोपर्यंत आपण ज्या देशांनी प्रचंड प्रगती केली आहे त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही.”

नारायण मूर्ती म्हणाले की, देशाची कार्य उत्पादकता वाढवण्यासाठी तरुणांना पुढे यावे लागेल. “मी तरुणांना आवाहन करतो की, पुढे येऊन म्हणा, हा माझा देश आहे. "मला आठवड्यातून ७० तास काम करायला आवडेल." दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनीने हे केले होते, असे नारायण मूर्ती यांनी सांगितले. बर्‍याच वर्षांपासून, दोन्ही देशांनी त्यांच्या नागरिकांनी काही अतिरिक्त तास काम केले आहे.

दिल्ली, मुंबई नाही 'या' राज्यातील लोक घेतात सर्वात जास्त कर्ज; जाणून घ्या सविस्तर

नारायण मूर्ती म्हणाले की, भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे देशाला प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे नेण्याची जबाबदारीही तरुणांच्या खांद्यावर आहे. देशाची कार्यसंस्कृती बदलली पाहिजे. ते शिस्त, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयावर आधारित असले पाहिजे. तसे झाले नाही तर सरकार फार काही करू शकणार नाही, असंही मूर्ती म्हणाले. 

टॅग्स :नारायण मूर्तीइन्फोसिस